रत्नागिरी : अल्पबचत सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथे जलशक्ती अभियान अंतर्गत रत्नागिरी जिल्हा जलसाक्षरता कमिटी, हिरवळ प्रतिष्ठान आणि जलसाक्षरता अभियान , यशदा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय जल परिषदेचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत व जलपुरुष राजेंद्रसिंह राणा यांच्या हस्ते झाले.
यावेळी जलपुरुष राजेंद्रसिंह राणा, रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंडया साळवी, जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, हिरवळ प्रतिष्ठानचे किशोर धारिया, माजी आमदार बाळ माने, संजय यादवराव, रत्नागिरी पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता श्रीमती नारकर, कार्यकारी अभियंता जगदीश पाटील आदि मान्यवर तसेच जलप्रेमी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, जलपुरुष राजेंद्रसिंह राणा तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते जल व तुलशी पूजनाने करण्यात आली. तसेच यावेळी जलप्रतिज्ञाही घेण्यात आली.
या एकदिवसीय जल परिषदेला पालकमंत्री ॲड. अनिल परब दूरदृश्यप्रणालीद्वारे शुभेच्छा देताना म्हणाले, जलव्यवस्थापन व जलसाक्षरतेसाठी राबविण्यात आलेला हा एका चांगला उपक्रम असून जिल्हा सुजलाम सुफलाम होण्यासाठी त्याचा नक्कीच लाभ होईल.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, जलव्यवस्थापन, जलशक्ती, जलसाक्षरता ही चळवळ म्हणून उभी राहणे गरजेचे असून ही चळवळ प्रत्येकापर्यंत पोहोचविण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न गरजेचे आहे. जलसाक्षरता व जलशक्ती जनतेपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यभरात विद्यापीठ स्तरावर जलसाक्षरता व जलशक्ती अभियान राबविण्यात येईल. जिल्हयात जलदूत नेमणे व पाणी वापर संस्था याबाबत जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा. जलदूत नेमणे, पाणी वापर संस्था,जिल्हयात होणारा पाऊस आणि घेण्यात येणारे पिक आदि विषयांबाबत चर्चा करण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे अधिकारी व संबधितांबरोबर लवकरच बैठक घेण्यात येईल. पुढील वर्षापासून जलउपयुक्त अभ्यासक्रम विद्यापीठामध्ये सुरु करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
जलपुरुष राजेंद्रसिंह राणा म्हणाले, कोकणाला निसर्गाने भरभरून दिले आहे. येथील पाण्याचं योग्य व्यवस्थापन, नियोजन करणे गरजेचे आहे. वातावरणातील होत असलेले बदल पाहता येथे होणारा पाऊस व घेण्यात येणारे पीक यांची सांगड घालणे गरजेचे आहे. बदलते हवामान, पाऊस आणि पिक पध्दती यांचा अभ्यास करण्यासाठी टास्क फोर्स नेमणे, पाठपुस्तकात पाण्याविषयीचे महत्व मांडणे आणि जलउपयुक्त संदर्भात पदवी अभ्यासक्रम सुरु करणेही गरजेचे असल्याचे त्यांनी सुचविले.
छतावरील व शिवारातील पुनर्भरण व जलसंकलन या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
०००