(फुणगूस / एजाज पटेल)
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दूरदृष्टी असलेले नेते आहेत. त्यांच्या संकल्पनेतील केंद्र सरकारची जलजीवन योजना ही देशातील सर्वात मोठी महत्वकांक्षी योजना आहे. असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी देवरुख येथे शुक्रवारी केले. देवरूख येथील पंचायत समितीच्या सभागृहात जलजीवन योजना आणि पंतप्रधान आवाज योजनेची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी या दोन्ही योजनांचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते
यावेळी ते बोलताना ते पुढे म्हणाले की, केंद्र सरकारची जलजीवन योजना ही सर्वात मोठी योजना आहे. या योजनेसह अनेक योजनांच्या माध्यमातून देशातील नागरिकांच्या जीवनात बदल घडवण्याचे काम केंद्र सरकारच्या माध्यमातून केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०१४ सालापासून देशातील सर्वसामान्यांचे हित जोपासणारे निर्णय घेत आहेत. त्यांच्या संकल्पनेतील केंद्र सरकारच्या जलजीवन योजनेचे काम सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
याप्रसंगी माजी आमदार प्रमोद जठार, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव, प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, सहाय्यक प्रकल्प संचालक संतोष गमरे, जलजीवन योजनेच्या कार्यकारी अभियंता मयुरी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पूजार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी, संगमेश्वरचे तहसीलदार सुहास थोरात, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. एस. सोनवणे, देवरूख नगरपंंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चेतन विसपुते आदींसह सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.