( रत्नागिरी )
जलजीवन मिशन अंतर्गत घराघरात नळ देण्याच्या दृष्टीने शासनाच्या योजंचा पाठपुरावा करताना रत्नागिरी तालुक्यातील मिऱ्या, शिरगाव, निवळी तीठा व अन्य ३४ गावांची प्रादेशिक पाणीपुरवठा योजना नुकतीच मंजूर झाली असून या योजनेमुळे सुमारे १ लाख लोकसंख्येला फायदा होणार आहे. ही योजना प्रामुख्याने बावनदी येथील पाण्याचा स्त्रोत वापरून पूर्ण केली जाणार आहे. प्रती माणसी ५५ लि. पाणी देण्याच्या दृष्टीने त्याची निर्मिती केली जाणार आहे. २०५३ साली या परिसराची लोकसंख्या सुमारे २ लाखांच्या आसपास जाईल असे गृहीत धरून या पाणी योजनेची निर्मिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून केली जाणार आहे.
या योजनेचा दरडोई खर्च सुमारे ५ हजार ५०० रुपये येईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही पाणी योजना नुकतीच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नवी पनवेलचे अधिक्षक अभियंता चंद्रकांत गजभिये यांनी मंजूर केली असून या ३४ गावातील पाण्याचे स्वप्न यामुळे पूर्ण होण्यास मदत होणार आहे.