अयोध्येत राममंदिराची उभारणी जोमाने चालू आहे. रामजन्मभूमीसाठी गेली अनेक वर्षे लढा दिला गेला, तेथे राममंदिर उभारण्याचे रामभक्तांचे मागील काही दशकांचे स्वप्न पूर्णत्वाला जात आहे. मंदिराची उभारणी अंतिम टप्प्यात आली आहे. अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या रामललाच्या मूर्तीच्या अभिषेकाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. या कार्यक्रमासाठी आमंत्रित पाहुण्यांशी संवाद साधण्यासाठी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने हिंदी, गुजराती, इंग्रजी आणि इतर अनेक भाषांमधील तज्ञांची टीम तयार केली आहे. मंगळवारपासून अतिथी मंडळींशी संवाद साधला जाणार आहे.
सर्वांनी २० जानेवारीला दिवसा किंवा २१ जानेवारीच्या सकाळपर्यंत अयोध्येत पोहोचावे, अशी विनंती पाहुण्यांना करण्यात आली. या शिवाय या महोत्सवासाठी येणाऱ्या सर्व अतिथींचा प्रवासाचा तपशील मागवला जात आहे. प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी या सर्वांना सकाळी १० वाजता रामजन्मभूमी संकुलात पोहोचावे लागेल. काही तज्ज्ञांवर ३०० तर काहींवर ५०० अतिथींशी संवाद साधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. अतिथींमध्ये देशातील नामांकित संत, महंत, खेळाडू, सिनेसृष्टीतील कलाकार, शास्त्रज्ञ, लेखक, कवी, इतर कलाकार यांचा समावेश आहे.
लक्षणीय बाब म्हणजे अतिथींना फोन केल्यानंतर तज्ज्ञ त्यांच्याशी ‘जय श्रीराम’ने संभाषण सुरू करू करत आहेत. यानंतर प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमांची माहिती त्यांना दिली जाईल. आतापर्यंत निम्म्या अतिथींशी फोनवरून संभाषण साधण्यात आले आहे. हा क्रम पुढील दोन ते तीन दिवस सुरू राहणार आहे.
२२ जानेवारीला उद्घाटन झाल्यानंतर 26 जानेवारीपासून मंदिर भाविकांसाठी खुले होणार आहे. २६ जानेवारीपासून दर्शन घेणार्यांना आधी नोंदणीकरून ऑनलाईन तिकिटे घ्यावी लागणार आहेत.