( गणपतीपुळे/ वैभव पवार )
रत्नागिरी तालुक्यातील माध्यमिक विद्यामंदिर जयगड येथे रत्नागिरी पंचायत समितीच्या सभापती सौ. संजना उदय माने यांच्या विशेष प्रयत्नाने विद्यार्थ्यांचे जुने आधार कार्ड दुरुस्ती करणे, अपडेट करणे आणि नव्याने आधार कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड शिबीर शासनाने निर्गमित केलेल्या कोविड – १९ प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करत यशस्वीरीत्या राबविण्यात आले.
रत्नागिरी तालुक्यातील माध्यमिक विद्यामंदिर जयगड या प्रशालेत जयगड व जयगड परिसरातील अत्यंत ग्रामीण भागातून असंख्य विद्यार्थी ज्ञानार्जन करण्यासाठी येत असतात. या विद्यार्थ्यांना शासनामार्फत अनेक शासकीय योजनांचा आणि शासकीय शिष्यवृत्तीचा लाभ मिळविण्यासाठी प्रत्येकाचे आधार कार्ड असणे वा अपडेट असणे अत्यावश्यक असल्याने अनेक विद्यार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा आणि विविध शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यात अनेक अडचणी येत होत्या. कारण रत्नागिरी ते जयगड हे अंतर ६० किमी पेक्षा जास्त असल्याने विद्यार्थी व पालक यांना नाहक मनःस्ताप व त्रास सहन करावा लागत होता. ही बाब जयगड पंचक्रोशी शिक्षण मंडळाने पंचायत समिती सभापती सौ. संजना माने यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर कर्तव्यदक्ष असणाऱ्या सभापती संजना माने यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे कार्यतत्पर जिल्हाधिकारी डॉ बी. एन. पाटील यांना प्रत्यक्ष भेटून याकामी लक्ष वेधले. त्यासोबतच आवश्यक पत्रव्यवहार देखील केला. सभापती संजना माने यांनी केलेली विनंती आणि विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय व अडचणी लक्षात घेऊन या आधार शिबिरास मान्यता दिली.
त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या सहकार्याने आणि पंचायत समिती सभापती संजना उदय माने यांच्या सक्षम पुढाकाराने आणि माध्यमिक विद्यामंदिर जयगड यांच्या विद्यमाने आधार दुरुस्ती, आधार अपडेट आणि नवीन आधार कार्ड काढणे हे शिबीर मोठ्या उत्साहात आणि लाभार्थ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
संस्थेचे अध्यक्ष बशीरभाई होडेकर, उपाध्यक्ष तथा समाजकल्याण समितीचे माजी सभापती शरद चव्हाण, सचिव रवींद्र पोटफोडे, यांच्यासह प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. प्रदीप वाघोदे, ज्येष्ठ शिक्षिका सौ. स्नेहा खेडेकर, श्री. मुकुंद पाटील, श्री. निवास पाटील, श्रीमती जोशी, यांनी शाळा स्तरावर जनजागृती आणि इतर सहकार्य केले.
अत्यंत कमी कालावधी, तरीही विद्यार्थ्याच्या सोयीसाठी उपयुक्त नियोजन आणि शिबीर राबविण्याची ईच्छाशक्ती यामुळे हे यशस्वी झाले. या यशस्वी शिबीरासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या पंचायत समिती सभापती संजना उदय माने यांना शिक्षण संस्था, प्रशाला, विद्यार्थी आणि पालक यांनी धन्यवाद देत समाधान व्यक्त केले.
यावेळी संस्था पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते उदय माने, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.