(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील जयगड परिसरात तीन मोठे उद्योगसमुह असून त्यांनीच पंचक्रोशीतील समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. एम. देवेंदर सिंह यांनी केले आहे.
पोलीस अधिक्षक श्री. धनंजय कुलकर्णी, प्रांत डॉ. विकास सुर्यवंशी, तहसीलदार शशिकांत जाधव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. अनिरूद्ध साळवी, कमलेश बापट, प्रसाद गुरव, सरपंच फरजाना डांगे यांनी समस्यांबाबतचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांना संगितला.
पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी गेल्या आठवड्यात जयगड पंचक्रोशीचा दौरा केला होता. या दौऱ्यात ग्रामस्थांनी आपल्याला भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या होत्या. जे. एस. डब्ल्यू पोर्ट, एनर्जी, चौगुले पोर्ट या कंपन्यांनी स्थानिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या.
सडेवाडीत गणेश विसर्जन घाटात ये-जा करण्यासाठी कायमस्वरूपी पक्का रस्ता बांधून मिळावा, श्रीदेव कन्हाटेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरूस्ती, खोल विहिरीला कुंपण घालून डागडुजी करणे, कंपनीतील कामगारांना पगारवाढ, जयगड पंचक्रोशीतील गावांसाठी ११ ट्रान्सफार्मरसह आवश्यक सुविधा मिळाव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. तीन एकर मोकळ्या जागेवर खोदण्यासाठी कंपन्यांनी सहकार्य करावे, जयगड- निवळी रस्त्याची दुरूस्ती, अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. पाच ग्रामपंचायतींचे घरबांधणीला परवानगी देण्याचे अधिकार बंदर विभागाकडे देण्यात आले असून ते पुन्हा ग्रा.पं.ना द्यावे अशी मागणी करण्यात आली. जयगड खाडीतील कोळसा आयात बंद करण्याची मागणी करण्यात आली. साखर बौद्धवाडी स्मशानभूमीचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. सांडपाणी व्यवस्थापन प्रणाली लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी करण्यात आली. कुणबीवाडी रस्त्यालगत कोळशाची भुकटी उडून होणाऱ्या त्रासावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी बैठकीत करण्यात आली.