(सांगली)
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मुलगा प्रतीक पाटील यांचा शाही विवाह सोहळा रविवारी थाटात पार पडला. इस्लामपूर-बहे राजेबागेश्वरच्या पूर्वेस हा शाही लग्नसोहळा पार पडला. सांगलीतील किर्लोस्करवाडी येथील किर्लोस्कर ब्रदर्सचे सर्वेसर्वा उद्योगपती राहुल किर्लोस्कर यांची सुकन्या अलिका यांच्यासोबत प्रतीक हे विवाहबंधनात अडकले असून त्यांच्या विवाह सोहळ्याप्रसंगी अनेक मोठे नेते उपस्थित होते.
या विवाह सोहळ्याला सर्व पक्षीय राजकीय मंडळींनी हजेरी लावली होती. यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले, श्रीमंत शाहु महाराज, खासदार श्रीनिवास पाटील उपस्थित होते. तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाजप नेते हर्षवर्धन पाटील, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, खासदार प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांच्यासह राज्यातील मंत्री, आमदार आणि खासदारांसह मोठ्या नेत्यांनी उपस्थित राहत वधू वरांना शुभेच्छा दिल्या.