जम्मू-काश्मीरमध्ये सोमवारी रात्री उशिरा एक धक्कादायक घटना उघडकीस आली. जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक (तुरुंग) हेमंत लोहिया यांची त्यांच्या राहत्या घरी हत्या केली गेली आहे. डीजी जेल हेमंत लोहिया यांचा मृतदेह जम्मू-काश्मीरमध्ये त्यांच्या मित्राच्या घरी सापडला आहे. लोहिया यांचा आधी श्वास गुदमरण्यात आला आणि नंतर केचपच्या बाटलीने त्यांचा गळा चिरण्यात आला. सध्या पोलिसांना त्यांच्या घरगुती नोकरावर संशय आहे, जो अद्याप फरार आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने यासंदर्भात माहिती दिली आहे.
जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक (तुरुंग) एच के लोहिया यांचा मृतदेह काल सोमवारी रात्री उशिरा उदयवाला येथील त्यांच्या मित्राच्या घरी संशयास्पद स्थितीत सापडला. प्राथमिक तपासानुसार लोहिया यांचा गळा धारदार शस्त्राने चिरण्यात आला होता. त्याचबरोबर मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे. घटनेपासून फरार असलेल्या घरातील नोकरावर खुनाचा संशय व्यक्त केला जात आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस तपास करत होते. दरम्यान, रात्री उशिरा लोहिया यांचे पार्थिव जम्मूतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) रुग्णालयात हलवण्यात आले.
पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी ही अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचे म्हटले आणि जसीर नावाच्या त्याच्या घरगुती नोकराला पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. सध्या नोकर फरार आहे. माहिती देताना सिंह म्हणाले की, संशयिताने 57 वर्षीय लोहिया यांचा मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न केला. लोहिया यांची ऑगस्टमध्ये केंद्रशासित प्रदेशातील तुरुंग महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.