(दापोली)
काश्मिरातील चार मुलांच्या आईचा तेथीलच चार मुलांच्या बापावर जीव जडला. दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले आणि या प्रेमीयुगुलाला कोकण पाहण्याचा मोह झाला. या मोहापायी त्यांनी दापोली गाठली. मात्र, त्यांच्या पाळतीवर असणाऱ्या पोलिसांना याचा सुगावा लागताच या दोघांना दापोलीत शुक्रवारी (२३ जून) अटक केली. या दोघांनाही कुपवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
काश्मीरमधील एका ५३ वर्षीय पुरुषाचे एका ४१ वर्षीय महिलेशी प्रेमसंबंध जुळले. दोघेही विवाहित असून, दोघांनाही चार चार मुले आहेत. प्रेमात अखंड बुडालेल्या या प्रेमीयुगुलाने तिथून पळ काढत पहिले राजस्थान गाठले. त्यानंतर दोघेही मुंबईत आले. मुंबईत आल्यानंतर दोघांनाही कोकण पाहण्याचा मोह झाला. कोकणातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या दापोलीत वारंवार येऊन गेलेला ‘तो’ त्या महिलेसह दापोलीत आला. विवाहित महिला बेपत्ता असल्याची फिर्याद तिच्या पतीने कुपवाडा पोलिस स्थानकात दिली होती. त्यामुळे पोलिस तिचा शोध घेत होते.
महाराष्ट्र आणि राजस्थान येथे पुरुषाचा संपर्क असल्याची माहिती कुपवाडा पोलिसांना मिळाली. तसेच हे दोघेही दापोलीत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.
कुपवाडा पोलिस स्थानकाचे सहायक पोलिस निरीक्षक रियाज अहमद यांच्या नेतृत्वाखाली हा तपास सुरू होता. महिलेच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक दापोलीत दाखल झाले. दापोली पोलिसांच्या सहाय्याने शोध सुरू करण्यात आला. दापोलीतील हॉटेल, लॉज तपासण्यात आले. मात्र, दोघांचा पत्ता लागत नव्हता.
अखेर दोघे रस्त्यावर फिरताना पोलिसांना दिसले. विवाहितेचा पती पोलिसांसोबत असल्याने महिलेची लगेच ओळख पटली. या दोघांना शनिवारी (२४) जून) न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर दोघांना कुपवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.