(चिपळूण)
चिपळूण – कराड मार्गावरील कुंभार्ली घाटात कारने जात असतानाच अचानकपणे पाळीव जनावरे आडवी आल्याने कार रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी 7.45 च्या सुमारास घडली. या अपघातात एका वयोवृध्द प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. सुरेश लक्ष्मण कांबळे (70, शिराळा-सांगली) असे मृत्यू झालेल्या वयोवृध्दाचे नाव आहे. कार चालक बाबासाहेब बाळू सुवासे (सध्या दापोली, मूळ कोल्हापूर) हे दापोली येथे समाजकल्याणच्या वसतिगृहात अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
मंगळवारी सकाळी ते त्यांच्या कारने एकटेच कोल्हापूरच्या दिशेने जात होते. ते शहरातील बहादूरशेख- चिपळूण येथे आले असता त्यांना तिघा प्रवाशांनी हात दाखवला असता त्यांनी कार थांबवली. त्या प्रवाशांनी आम्हाला इस्लामपूरला सोडा अशी विनंती केली. त्यावर सुवासे यांनी आपण तिकडे जाणार नाही असेही सांगितले. त्यावर त्या प्रवाशांनी हायवेला सोडा अशी गळ घातल्याने एक पती-पत्नी व वृद्ध सुरेश कांबळे यांना कारमध्ये घेतले. ही कार पोफळी येथील लीला हॉटेलच्या दोन कि मी. अंतरावर महामार्गावरून घाट चढत असताना अचानक त्यांच्या कारच्या समोर पाळीव जनावरे आल्याने चालक सुवासे यांनी कार उजव्या बाजूला घेतली असता ती पलटी होऊन रस्त्याच्या खाली जाऊन चरात अडकली.
कुंभार्ली घाटात महामार्गावर पावसामुळे धुक्याचे वातावरण होते. कार घाट चढत असताना अचानक एक गाय कारच्या समोर आल्याने चालक सुवासे यांनी कार उजव्या बाजूला घेतली असता कार उलटली व रस्त्याच्या खाली जाऊन चरात अडकली. या अपघातात वृद्ध सुरेश लक्ष्मण कांबळे यांचा मृत्यू झाला तर अन्य तिघे वाचले. अपघात झाल्यानंतर चालक सुवासे व पती पत्नीला सुखरूप बाहेर काढण्यात आले. चालक सुवासे हे मयत सुरेश कांबळे यांना बाहेर काढत असताना प्रवासी पतीपत्नी तेथून निघून गेले, परंतु त्यांचा मोबाईल कारमध्येच पडल्याचे समजते. अपघातात कारचे सुमारे अडीच ते तीन लाखाचे नुकसान झाले आहे.
या अपघातानंतर चिपळूण पोलिस ठाण्यात कार चालक बाबासाहेब सुवासे यांनी फिर्याद दिली. हा अपघात अलोरे-शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत झाला.