( रत्नागिरी / प्रतिनिधी )
रत्नागिरीतील प्रसिध्द लेखिका कै.स्मिताताई राजवाडे यांची मुळ संकल्पना असलेल्या जनसेवा ग्रंथालयाचे उत्कृष्ट वाचक पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत शनिवार दि.10 सप्टें. रोजी करण्यात आले.
रत्नागिरी लक्ष्मीचौक येथील जनसेवा ग्रंथालयाच्या 34 व्या वर्धापन दिनानिमित्त उत्कृष्ट वाचक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कै.स्मिताताई राजवाडे यांनी या पुरस्काराची मुळ संकल्पना मांडली होती. त्यांच्या संकल्पनेला साकार रूप देण्याचा प्रयत्न जनसेवा ग्रंथालयाने केला. सुमारे साडेतीनशेहून अधिक वाचकांमधून पुरस्कार निवड समितीने दोन गटात चार वाचकांना उत्कृष्ट वाचक पुरस्कार देऊन सन्मानित केले.
प्रौढ गटात अनुराधा चांदोरकर यांना उत्कृष्ठ वाचक पुरस्कार देण्यात आला. तर बालगटात हर्ष पाटील याला प्रथम, तर ऋषिकेश केळकर, शारदा अभ्यंकर यांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार निवड समितीतर्फे पुरस्कार विजेते निवडण्याचे काम कार्यकारिणी सदस्य अमोल पालये, आणि ग्रंथपाल सौ.सिनकर यांनी पाहिले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला पुरस्कार निवड समिती प्रमुख अमोल पालये यांनी उत्कृष्ट वाचक पुरस्कार निवड प्रक्रियेबाबत भूमिका मांडली. हा पुरस्कार सदोदित चालू ठेवून यामुळे वाचकांना वाचण्यास प्रवृत्त करण्याचे काम होईल, असा विश्वास जनसेवा ग्रंथालयाचे अध्यक्ष दळवी यांनी व्यक्त केला. त्यानंतर मान्यवरांच्याहस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
यावेळी केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन पाटील, कोमसापचे कार्यवाह माधव अंकलगे, कोमसापचे सल्लागार अरुण नेरूरकर, जनसेवा ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रकाश दळवी, कार्याध्यक्ष राहुल कुळकर्णी आदी. मान्यवर उपस्थित होते. यांसह लेखक डॉ.शरद प्रभुदेसाई, डॉ.श्रीकृष्ण जोशी, विवेक भावे, वाचक-सभासद, साहित्यप्रेमी, कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.