(रत्नागिरी)
नगर परिषदेमार्फत दिले जाणारे दाखले, उतारांच्या शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यासाठी हरकतीही मागवण्यात आल्या. पूर्वीच्या दराच्या जवळपास दुप्पट ही दरवाढ होती. या विरोधात जागरूक नागरिकांनी हरकती दाखल केल्या होत्या. यामध्ये ऍड. सचिन रामाणे, ऍड. अमेय परूळेकर, माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष निलेश भोसले, अजिंक्य कासारकर, केशव भास्कर, विजय जैन यांनी इमेलद्वारे हरकत नोंदवल्या होत्या. तर इतरही अनेक हरकती न.प. प्रशासनाला प्राप्त झाल्या असून त्यात काही सुचनाही केल्या गेल्या होत्या.
अन्यत्र ठिकाणी बचत करा, इतर खर्च, दिखावे, अनावश्यक शुशोभिकरण कमी करा परंतु दाखल्यांच्या शुल्कात दरवाढ करून सर्वसामान्यांच्या खिशाला चाट देवू नका. एकूणच जनमत लक्षात घेवून अखेर न.प. प्रशासकांनी दाखल्यांच्या शुल्कात दरवाढ करण्याचा निर्णय तूर्तास मागे घेतला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.