(बाली)
इंडोनेशियातील बाली येथे जी-२० शिखर परिषद बुधवारी संपली. यजमान इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी पुढील वर्षासाठीचे अध्यक्षपद भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केले. यानंतर मोदी म्हणाले की, सध्या जगाचे लक्ष भारताकडे आहे. त्यांना आमच्याकडून अपेक्षा आहेत. पुढील एका वर्षात जी-२० ने एकत्र काम करण्याची आमची इच्छा आहे.
बालीमध्ये पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट घेतली. जागतिक पटलावर भारताचे महत्त्व मंगळवारी पहिल्या सत्रात मांडण्यात आले होते. वास्तविक मोदी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना पाहू शकले नव्हते. ते जागेवरून उठून पलीकडे जात होते, तेव्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांना बोलावले आणि नंतर दोघांचीही भेट झाली. इमॅन्युएल मॅक्रॉनही तेथे पोहोचले आणि तिन्ही नेते काही वेळ बोलत राहिले.
यानंतर ब्रिटनचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक आणि मोदी यांची दोनदा भेट झाली. त्यांची मंगळवारी अनौपचारिक भेट झाली आणि बुधवारी औपचारिक चर्चा झाली. ब्रिटनने लगेचच ३ हजार भारतीयांना नवीन व्हिसा जारी केला जाईल, असे जाहीर केले. भारताचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर मोदी म्हणाले की, महिलांच्या नेतृत्वाला प्रोत्साहन देणे आमचे पहिले प्राधान्य असेल. आपण ‘जी-२०’ सकारात्मक जागतिक बदलाचे एक स्फूर्तिदायक व्यासपीठ बनवू. भारत यासाठी प्रमुख प्रवर्तक म्हणून सक्रिय असेल असे सांगितले.
१ डिसेंबरपासून भारत ‘जी-२०’चे अध्यक्षपद अधिकृतरीत्या स्वीकारणार आहे. ‘जी-२०’ची आगामी शिखर परिषद ९ आणि १० सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे. इंडोनेशियात बाली येथे आयोजित केलेल्या दोन दिवसीय जी-२० राष्ट्रगटाच्या शिखर परिषदेच्या समारोपात भारताकडे इंडोनेशियाकडून या गटाचे अध्यक्षपद सोपवण्यात आले.