(रत्नागिरी)
नागपूर येथे दि. 27 जानेवारी 2023 रोजी झालेल्या आंतरराष्ट्रीय संस्कृत शॉर्ट फिल्म फेस्टीवलमध्ये रत्नागिरी च्या “विहग इव मुक्त:” या संस्कृत शॉर्ट फिल्मला जगभरातून दुसरा क्रमांक प्राप्त झाला. शॉर्ट फिल्म चे यंदाचे ४ थे वर्ष होते. या महोत्सवात 6 देशातून एकूण 110 फिल्म आल्या होत्या. त्यातून एकूण 18 सर्वोत्तम फिल्म निवडल्या गेल्या आणि त्यातूनही काटे की टक्कर म्हणून 8 शॉर्टलिस्ट करण्यात आल्या होत्या. त्यांचे प्रदर्शन संस्कृत भारती दिल्ली आयोजित अखिल भारतीय छात्र संमेलनामध्ये नागपूर येथील कविवर्य सुरेश भट नाट्यगृहात हजारोंच्या उपस्थित झाले.
प्रसिद्ध अभिनेते योगेश सोमण, यांच्या हस्ते हे पारितोषिक वितरण झाले. प्रशस्तीपत्रक, सन्मानचिन्ह, आणि रुपये 75,000 असे पारितोषिक स्वरूप होते. भारतातून सुद्धा काश्मीर ते तामिळनाडू पर्यंत च्या धरती वरच्या शॉर्टफिल्म्स यात सहभागी होत्या. संस्कृत ही भारतातील एक प्रमुख आणि प्राचीन समजली जाणारी भाषा आहे. तिची प्रतिभा अधिक उंचावण्यासाठी आणि भारतातील किंबहुना जगातील प्रत्येक घटकापर्यंत ती पोहचावी प्रत्येक प्रांतातल्या प्रत्येक व्यक्तीला ती आपलीशी वाटावी यासाठीच संस्कृत भारती दिल्ली या संस्थेने आंतरराष्ट्रीय शॉर्टफिल्म महोत्सव आयोजित केला होता.
या फिल्मची संकल्पना शैलेश इंगळे या तरुण उमद्या कलाकाराची होती. त्याने या संहितेचे संपूर्ण लिखाण केले दिग्दर्शक केले आणि त्याला संस्कृत मध्ये उभं करण्याचे शिवधनुष्य पेललं ते सुश्रुत चितळे आणि पूर्वा चुनेकर यांनी. तसेच सुश्रुत चितळे यांनी सुद्धा या शॉर्टफिल्म चे दिग्दर्शन केले. श्री ललित कोर्डे यांनी या लघुपटाच्या निर्मात्याची भूमीका पार पाडली. तर ही संपुर्ण शॉर्टफिल्म उभी राहण्यासाठी मोलाचं सहकार्य आणि चतुरस्त्र मार्गदर्शन होते रत्नागिरीतील नामवंत कलाकार नंदकिशोर जुवेकर याचे. तसेच अभिनयाची भक्कम बाजू समर्थपणे पेलली गो.जो. महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ निधी पटवर्धन यांनी. आणि त्यांना उत्तम सह अभिमानाची जोड दिली केतकी जोशी यांनी. तर सायली लिमये यांनी पटकथा साहाय्य केले.
यात प्रामुख्याने उल्लेख होतो उत्तम तांत्रिक बाजूचा, त्यासाठी दिग्दर्शन साहाय्य आणि संकलन रत्नागिरीतले नामवंत कलाकार मयूर दळी यांनी केले. संगीताची सर्व जबाबदारी राधिका भिडे यांनी निभावली. तसेच ध्वनीची सूत्रे आदित्य गुरव यांनी सांभाळली. या लघुपटाचे छायाचित्र सिद्धाराज कृष्णनाथ सावंत व राज बोरकर यांनी उठावदारपणे केले होते. त्यांना सहाय्य पंकज सावंत यांनी केले. सेट साठी रोहित नागले , विशाल तलार यांनी विशेष मेहेनत घेतली. तर ग्राफिक्स डिझाइन ऋग्वेद जाधव यांचे होते. प्रकाश योजना अभिजीत जोशी , रंगभूषा आणि वेशभूषा स्नेहल कोकणी व रोशनी संसारे यांनी सांभाळली. तसेच व्यवस्थापन सम्यक हातखंबेकर आणि वरद चुनेकर यांनी केले. टीमचे सदस्य म्हणून चैत्राली लिमये, सिद्धांत सरफरे यांचे मोलाचे सहकार्य होते.
संपूर्ण शॉर्टफिल्म च्या प्रवासात अनेक तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभले त्यात गो.जो. महाविद्यालयाच्या संस्कृत विषयाच्या प्राध्यापिका सौ. डॉ. कल्पना आठल्ये, श्री. विठ्ठल सामंत (पुणे), श्री. धनंजय वैद्य (अमेरिका), सौ. जयश्री लिमये, सौ.प्रतिभा चुनेकर श्री. केतन सावंत, श्री. तन्मय हर्डीकर, सीमंतिनी जोशी यांचे योगदान आहे. जागतिक स्तरावर अभिमानास्पद कामगिरी करून रत्नागिरीचा ध्वज अटकेपार नेल्याबद्दल सर्व स्तरातून शॉर्टफिल्म वर कौतुकाचा वर्षाव होत आहे.