(खेड / भरत निकम)
शहराजवळून वाहणाऱ्या जगबुडी नदीतील गाळ काढणे कामाचा प्रस्ताव सध्या अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या महिन्याभरात सीआरझेडची परवानगी मिळण्याची दाट शक्यता असून जगबुडी पात्रातील गाळ काढल्यामुळे, खेड बाजारपेठत पुराचे पाणी शिरुन नुकसान होणाऱ्या ३५० व्यापारी आणि ५०० कुटुंब पुरमुक्त होणार आहेत.
खेड शहराजवळून वाहणाऱ्या जगबुडी आणि नारंगी या दोन्ही नद्यांना पूर येतो. गाळाने भरलेल्या नदीपात्रातील पाणी खाडीकडे जाण्याऐवजी शहरात मोठ्या प्रमाणावर घुसते. यामुळे शहरातील ३५० व्यापारी व ५०० नागरिक यांचे दरवर्षी पावसाळ्यात नुकसान होते. अनेक जण पूराच्या पाण्यात अडकून पडतात. जगबुडी व नारंगी नदीच्या संगम होतो, तेथील पुढच्या खाडीत मोठ्या प्रमाणात गाळ साचून राहिलेला आहे. त्यामुळे हे पूराचे पाणी उलट फिरतं आहे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पूराचे पाणी भरल्यानंतर शहरातील व्यापारी आणि नागरिकांनी उपविभागीय अधिकारी राजश्री मोरे यांच्याकडे निवेदन देऊन जगबुडी नदीत साचलेला गाळ काढावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली गेली. याबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरु केलेला असताना समुद्राचे पाणी खाडीत जिथपर्यंत भरते, तिथून ५०० मीटर पर्यंत हा सीआरझेडचा सागरी प्रवण क्षेत्र आहे. त्यामुळे जगबुडी नदीतील गाळ काढण्यास सीआरझेडची परवानगी आवश्यक होती. हा खाडीतील गाळ काढण्याकरिता पुणे येथील खासगी एजन्सी मार्फत तपासणी पूर्ण केली होती. त्यानंतर अंतिम प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला होता. या प्रस्तावाला येत्या महिन्याभरात परवानगी मिळण्याची शक्यता आहे. या परवानगी नंतर जिल्हाधिकारी यांच्याकडून जिल्हा नियोजन मधून गाळ काढण्यास निधीची तरतूद होणार आहे. तदनंतर पाटबंधारे खात्याच्या यांत्रिक विभाग, अलोरे कडून यंत्रसामग्रीने जगबुडी खाडीतील गाळ काढण्याचे काम सुरु होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जगबुडी नदीसह खाडीतील गाळ काढल्याने जगबुडी आणि नारंगी या दोन्ही नद्यांना पूर येणार नाही. पूराचे पाणी गाळात अडते ते अडले जाणार नाही. तेव्हा पूराचे पाणी भरण्याच प्रश्न शिल्लक राहणार नाही. तसेच पुराचे पाणी भरल्याने ३५० व्यापारी आणि ५०० नागरिक हे पूरमुक्त होतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.