(नाणीज)
जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा शनिवारी 21 ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. लाखो भाविकांच्या साक्षीने होणाऱ्या या सोहळ्याची जोरदार तयारी सुंदरगडावर सुरू आहे. याच दिवशी आणखी एकूण दहा रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. याच दिवशी वसुंधरा पायी दिंड्या श्रीक्षेत्री येणार आहेत. जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या स्व-स्वरूप संप्रदायांचे भाविक हा सोहळा साजरा करीत असतात. या दिवशी वारीउत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे साक्षीदार बनण्यासाठी त्या दिवशी सुंदरगडावर भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. एक चैतन्याचा सोहळाच सारे अनुभवत असतात.
या सोहळ्यानिमित्त दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या शुक्रवार दि. 20 रोजी सोहळ्याची सुरुवात होत आहे. सकाळी नऊपासून श्री सप्तचिरंजीव महामृत्यूंजय याग व आन्नदान विधी कार्यक्रम सुरु होईल. यानंतर या सोहळ्याचे निमंत्रण देवदेवतांना मिरवणुकीने वाजतगाजत जाऊन दिले जाणार आहे.दुपारी 12.30 ते 1.30 यावेळी उत्सव मूर्तींची मिरवणूक आहे. ती नाथांचे माहेर येथून निघून सर्व देवदेवतांचे दर्शन घेत संतशिरोमणी गजानन महाराज मंदिर येथे पोहोचणार आहे. त्यानंतर नामगजर, प्रवचनकार पदवीदान कार्यक्रम, रात्री साडेसात वाजता गरबानृत्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
शनिवार दि. 21 ऑक्टोबर हा सोहळ्याचा मुख्य दिवस आहे. सकाळी दहा वाजता तीन ‘वसुंधरा’ पायी दड्यांचे स्वागत केले जाणार आहे. ग्लोबल वॉर्मिंग बाबत जनजागृती करीत या दड्या परभणी, नाशिक व वसई येथून निघाल्या आहेत. वेगवेगळ्या माध्यमांतून त्या पर्यावर जागृती करीत आहेत. या दिंड्या अतिशय शिस्तबद्ध वाटचाल करीत आहेत. त्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी आहेत. तरुणांचा सहभाग मोठा आहे. दुपारी तीन वाजता दहा रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यामुळे संस्थानकडे आता एकूण ५२ रुग्णवाहिका झाल्या आहेत. या रुग्णवाहिका अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचवीत आहेत. आत्तापर्यंत या सेवेमुळे 20 हजारांवर अपघातग्रस्तांचे प्राण वाचले आहेत.
दिवसभर चरण दर्शन सोहळा, पालखी परिक्रमा, यागाची पूर्णाहुती असे कार्यक्रम आहेत. रात्री 7.30 ला प.पू. कानिफनाथ महाराज यांचे अमृतमय प्रवचन आहे. त्यानंतर परम वंदनीय जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचे अमृतमय प्रवचन आहे. रात्री 9.30 ला जगद्गुरूंचे श्रींचे औक्षण व अभिष्टचतन सोहळा आहे. रात्री 10 नंतर जन्मोत्सव सोहळा आहे. त्यानंतर देवाला साकडे घालून वारी उत्सवाचा समारोप होईल. या सोहळ्याची सर्व तयारी पूर्ण होत आली आहे. भाविकांच्या स्वागतासाठी सुंदरगड आता सज्ज झाला आहे.