(नाणीज)
जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे गुरुपौर्णिमेदिवशी ५ रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे आता ४२ रुग्णवाहिका अपघातग्रस्तांच्या सेवाकार्यात २४ तास कार्यरत आहेत. याचवेळी व्हॅनिटी व्हॅनचेही लोकार्पण करण्यात आहे. गुरुपौर्णिमेला दुपारी ५ रुग्णवाहिकांचे लोकार्पण रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फीत कापून झाले.
महामार्गावरील अपघातातील जखमींवर तातडीने उपचार सुरू व्हावेत म्हणून संस्थानने २५ जुलै २०१० ही मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू केली. त्याला आता १३ वर्षे झाली आहेत. आता राज्यातील सर्व महामार्गावर संस्थानच्या ३७ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. त्या तातडीने अपघातस्थळी जाऊन जखमींना जवळच्या रुग्णालयात पोहोचवतात. ही सेवा पूर्ण मोफत आहे. त्यातून गेल्या तेरा वर्षांत १९ हजारांवर जखमींचे प्राण वाचले आहेत. त्याची उपयुक्तता लक्षात घेऊन आणखी ५ रुग्णवाहिकांचे आज लोकार्पण झाले. जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज व प.पु. कानिफनाथ महाराज यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. आता एकूण ४२ रुग्णवाहिका या सेवाकार्यात आहेत.
यावेळी एका व्हॅनिटी व्हॅनचे लोकार्पण करण्यात आले. ही व्हॅन भाविकांनी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांना भेट दिली होती. त्यांना प्रवचन, दर्शन सोहळ्यासाठी जाण्यास सोईचे व्हावे या हेतूने देण्यात आली होती. मात्र महाराजांनी ती स्वीकारली व लगेच तिथे त्यांनी दिव्यांगासाठी कार्य करणाऱ्या पॉझिटिव्ह सोल फौंडेशनला ही व्हॅन संस्थांनतर्फे भेट दिली. माझ्यापेक्षा या संस्थेला त्याची अधिक गरज असल्याचे महाराजांनी सांगितले.
या सोहळ्याला पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्यासह काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, रत्नागिरी जिल्हा पोलीस उपअधीक्षक विनीत चौधरी, मुंबईचे उपप्रादेशीक परिवहन अधिकारी अनिल वळवी, रत्नागिरीचे मोटार वाहन निरीक्षक अविनाश मोराडे, तहसीलदार राजाराम म्हात्रे, काँग्रेस अविनाश लाड आदी उपस्थित होते.
यावेळी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी संस्थानच्या रुग्णवाहिका उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले, “संस्थानचे सामाजिक उपक्रम खरोखरच स्तुत्य आहेत. अपघातातील जखमींना मोफत तातडीने रुग्णालयात पोहोचवण्याचा उपक्रम तर फार चांगला आहे. एखाद्याचे प्राण वाचवने यापेक्षा दुसरे काय चांगले असू शकते. मुंबई- गोवा महामार्गावर तर ८ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. पोलिसांना सहायभूत ठरणारा हा उपक्रम आहे. ” मुंबईचे प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल वळवी यांनीही या रुग्णवाहिका सेवा उपक्रमाचे कौतुक केले. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी समृद्धी महामार्गावर अशी रुग्णवाहिका संस्थानने ठेवावी अशी विनंती केली. या सोहळ्याचे सूत्रसंचालन सौ. श्रद्धा बोडेकर यांनी केले.