नाणीज : रत्नागिरी तालुक्यातील नाणीज येथील जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या सोहळ्यास संस्थानचे विश्वस्थ शांताराम दरडी, संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद भागवत, विवेक कांबळी इंद्रजीत सुर्यवंशी उपस्थित होते. प्रारंभी पाहुण्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
मुख्याध्यापिका सौ. अबोली पाटील यावेळी उपस्थित होत्या. विद्यार्थी पारंपरिक वेशात सहभागी होते. त्यात छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज, मावळे आदींचे वेष परिधान केले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश बोडके यांनी केले. त्यानंतर शिवमुद्रा घेण्यात आली. विद्यार्थी प्रसाद गुडघे याने छत्रपती शिवरायांचा जीवनपट उलघडून दाखवला. कु. शार्दूल याने नरवीर तानाजी मालुसरे यांचा पोवाडा सादर केला. चौथीच्या विद्यार्थ्यांनी ‘एकच राजा इथे जन्मला’ हे गीत सादर केले. अकरावीच्या मुलींनी शिवरायांचा पाळणा सादर केला. अन्य वर्गातील मुलांनी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले. मुलांच्या पथकाने लेझीम सादर केले. श्री दरडी यांनी शिवरायांची थोरवी सांगितली.
सौ. अबोली पाटील यांनी शिवरायांचे कार्य अंगी बानवण्यास सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका परब व अनुष्का खटकुळ यांनी केले. श्री लेंभे यांनी आभार मानले