(रत्नागिरी)
अमली पदार्थ विक्रीला लगाम, अवैध सावकारी, सायबर गुन्ह्यांसह इतर बहुसंख्य गुन्हे उघडकीस आणणाऱ्या जिल्हा पोलिसांची प्रतिमा उंचावत असतानाच देवरूख पोलिस स्थानकाच्या वाहन चालकाकडून गैरवर्तन झाले. साखरप्यानजीक मोर्डेखिंड येथील ट्रक अपघातात जखमी झालेल्या चालकाच्याच श्रीमुखात लगावली. ज्या रिक्षा चालकाने जखमी झालेल्यांना मदत केली त्यालाच कारवाई करण्याची भीती दाखवण्यात आली. यासंदर्भात देवरूख पोलिस निरीक्षकांकडे तक्रार करण्यात आली आहे.
सांगलीकडे जाणारा आयशर ट्रक (क्र.एमएच १०-जीटी८६८६) बुधवारी रात्री ९.३० वा. च्या मोर्डेखिंड येथे दरीमध्ये कोसळला. त्यावेळी दिनेश लाड हे आपल्या रिक्षाने साखरप्याकडे जात असताना ट्रकचे चालक आणि क्लिनर जखमी अवस्थेत पडून होते. त्यांना रिक्षा चालकांनी रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले. त्यावेळी तेथे पोलिस गाडी आली. त्यांच्या सोबत संदेश जाधव हे पोलिस दिनेश लाड यांच्यावर कारवाई करण्याची भीती दाखवत होते. चालक वैभव नटे यांनी ट्रक चालकाच्या श्रीमुखात लगावल्या. सोबत असणाऱ्या पोलिसांनी तर रिक्षा चालकाला गुन्हा दाखल करून रिक्षा परमिट रद्द करण्याची भीती दाखवली असल्याचे भाजपचे संगमेश्वर तालुका उपाध्यक्ष शंकर लाड यांनी पोलिस निरीक्षकांना दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे. अपघातप्रसंगी जखमींना मदत करणाऱ्यांना अशी वागणूक पोलिसांकडून मिळाली तर मदतीसाठी कोणीही पुढे येणार नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर गंभीर कारवाई करण्याची मागणी भाजपा नेते लाड यांनी केली आहे.
पोलिस प्रशासनाची प्रतिमा मलिन
व्यक्ती तितक्या प्रकृती पोलिस दलातही आहेत. ‘सदरक्षणाय, खलनिग्रहणाय…’ असे ब्रीद पोलिसांच्या खाकी वर्दीवर लावलेले आहे. याचा अर्थ सामान्य जनतेला सुरक्षित ठेऊन ‘खल’वृत्तीने वागणाऱ्यांना ठेचण्याचे काम पोलिसांनी करणे अपेक्षित आहे; परंतु अपघातात जखमी झालेल्या चालकाच्याच श्रीमुखात लगावणे, गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवणे हे कशाचे लक्षण म्हणावे? असा सवाल उपस्थित होत आहे. पोलीसांकडून असे प्रकार घडत असतील तर निंदनीय बाब आहे. यातून पोलिसांना आपल्या ब्रीद वाक्याचा विसर पडलेला दिसतो. पोलिस कर्मचारी स्वतःच्या कर्तव्याचे भान विसरून वागत असतील तर अशा पोलिस कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. रत्नागिरी पोलिस अधीक्षकांनी आता ही बाब गांभीर्यानं घेऊन अशोभनीय कृत्याबद्दल तसेच पोलीस खात्याची प्रतिमा मलीन करणाऱ्या पोलिसांवर त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे.