(देवरुख)
महाराष्ट्राचे आराध्य म्हणून ज्यांच्यासमोर आम्ही सदैव नतमस्तक होतो अशा छत्रपती शिवरायांच्या वंशजांप्रती सुरुवातीपासूनच आडमुठेपणा दाखवणाऱ्या शिवसेनेचा आणि विद्यमान शिवसेना पक्षप्रमुखांचा आम्ही तमाम शिवप्रेमी जनतेच्या वतीने तीव्र निषेध करत आहोत. वास्तविक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्यावर भाष्य करण्यास मी असमर्थ आहे. ज्ञान, वय आणि एकंदर कर्तृत्व याबाबतीत मी अजूनही या क्षेत्रात विद्यार्थी आहे. मात्र आमच्यासाठी एक अत्यंत जिव्हाळ्याचे आणि श्रद्धेचे स्थान असलेल्या कोल्हापूर राजगादीच्या वारसाला म्हणजेच युवराज संभाजीराजे यांना राज्यसभा निवडणूक अपक्ष लढविणार म्हणून कोंडीत पकडण्याचा दुर्दैवी प्रयत्न उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी केला हे अशोभनीय आहे. “शिवबंधन बांधून अधिकृतपणे शिवसेनेच्या तिकिटावर उभे रहा अन्यथा आम्ही अपक्ष उमेदवाराला मतदान करणार नाही” अशाप्रकारे भूमिका मांडणारे विश्वप्रवक्ते संजय राऊत एक अत्यंत संवेदनहीन, असुसंस्कृत, असभ्य राजकारणी आहेत. त्यांनी याआधीही मावळे आहेत म्हणुन छत्रपती आहेत असे म्हणुन प्रत्यक्षपणे छत्रपतींच्या गादीचा अवमान करण्याचे दुःसाहस केले होते. आपण ज्यांच्याबद्दल बोलतो किंवा आपले पक्षप्रमुख ज्यांना खासदारकी ऑफर करताहेत ते मातोंडकर, सय्यद, प्रियंका चतुर्वेदी किंवा सत्तार यांच्यासारखे सामान्य हुजरे कार्यकर्ते, नेते नसून उभ्या महाराष्ट्राचा मानबिंदू असणार्या छत्रपती शिवप्रभूंच्या भोसले घराण्याचे वारस आहेत याबद्दल यांच्या मनात तिळमात्र आदर नाही हे स्पष्ट झाले.
शरद पवार साहेब छत्रपतींच्या वंशजाला शिल्लक राहिलेली मते देणार असे म्हणाले होते. ज्यावेळी युवराज संभाजीराजे तत्कालीन मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या विनंतीवरून राष्ट्रपतीनियुक्त खासदार झाले त्यावेळी हेच पवार साहेब “पेशव्यांनी छत्रपतींना वस्त्रे दिली” असे तुच्छतापूर्वक म्हणाले होते. पण आता शिवसेनेमुळे सत्ता उपभोगायला मिळत असल्याने उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविषयी बोलण्यास स्वतः शरद पवार असमर्थ ठरत आहेत. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेचा आम्हाला खेद वाटतो. युवराज संभाजीराजे केवळ छत्रपतींचे वारस म्हणून राज्यसभेत जाणार नसून त्यांचे सामाजिक योगदान उल्लेखनीय आहे. लोकांच्या प्रश्नांचा दांडगा अभ्यास तर आहेच परंतू बहुतांश प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे आहेत. त्यांच्या याच प्रतिभेच्या जोरावर भाजपाने राष्ट्रपतीनियुक्त राज्यसभा खासदार होण्यासाठी त्यांची शिफारस केली होती. तेव्हाही त्यांच्यावर भाजपा अथवा देवेंद्रजींनी कोणत्याही प्रकारे भाजपाच्या नीतिला विरोध करू नये अथवा भाजपाच्या बाजूने बोलावे असे दडपण आणले नाही. उलट राजे स्वतंत्र वृत्तीचे आहेत हे माहीत झाल्यावरही यावेळी अपक्ष निवडणूक लढवू इच्छिणार्या राजेंना बिनशर्त पाठिंबा देऊ केला. म्हणजेच देवेंद्रजींच्या माध्यमातून भाजपाने राजेंचा कायम सन्मानच केला आहे.
उलट कायम गरळ ओकणाऱ्या शिवसेनेच्या संजय राऊतांनी सातारा असो किंवा कोल्हापूर, छत्रपतींच्या राजगादीचा कायमच अवमान केला आहे. वारस असण्याचे पुरावे मागून त्यांनी ब्रिटिश सरकारपेक्षा हीन पातळी गाठली आहे. शरद पवार जे बोलतात त्याच्या नेहमी विपरीत करण्यात पटाईत आहेत. हे आता महाराष्ट्राला कळून चुकले आहे. त्यामुळे कायम भावी असा टॅग लावून फिरण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे. 2016 मध्ये राजेंना उमेदवारी देण्याचे घोषित करून पहिल्यांदा विश्वासघात केला तर आता शिल्लक मते देण्याचे पत्रकार परिषदेत जाहीर करून मग पुन्हा एकदा यू-टर्न. आधीच शिवाजी महाराज “जाणता राजा’ नव्हते वगैरे विधाने प्रसिद्ध आहेत. त्यामुळे हा केवळ युवराज संभाजी राजेंचा नाही, केवळ मराठ्यांचा नाही तर महाराष्ट्रातील ज्या अठरापगड जातींना घेऊन हिंदवी स्वराज्य निर्माण केले त्या सर्व समाजांचा आहे.
शिवरायांनी समाज घडवला. एक योग्य दिशा दिली. मात्र ठाकरे सरकार या समाजाला भरकटवत आहे. आता ते सांगत आहेत की दुसर्या जागेसाठी मराठा समाजातील सामान्य कार्यकर्त्याला शिवसेनेने उमेदवारी दिली. पण यामागील वास्तव वेगळे आहे. देवेंद्रजी योग्यच म्हणाले होते, ‘होत न आज्ञा बिन पैसा रे’. जे अधिकृत शिवसेना उमेदवार देऊ शकतो ते अपक्ष उमेदवार कधीही देणार नाही याची खात्री पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना असल्याने त्यांनी क्रमांक एकची उमेदवारी आपल्या बोलक्या पोपटाला देऊन उरलेली अवघी तेरा प्रथम मान्यतेची मते राजेंना देण्याची दानत दाखवली नाही.
त्यामुळे येणार्या काळात महाराष्ट्र ठाकरे-पवार घराण्याचे राजकारण कायम लक्षात ठेवेल. जनता या गोष्टीकडे भावनिक होऊन डोळसपणे पाहतेय हे नक्की. तूर्तास संगमेश्वर भाजपा तालुकाध्यक्ष म्हणूनच नाही तर महाराज शिवछत्रपतींचा निष्ठावंत मावळा आणि विचारांचा पाईक म्हणून मी तुमचा, तुमच्या आणि पवारांच्या पक्षाचा आणि तुमच्या आघाडी सरकारचा धिक्कार करतो, अशी घणाघाती टीका प्रमोद अधटराव यांनी केली.