(मुंबई)
पुणे जिल्ह्यातील वढू येथे होणा-या छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रस्तावित स्मारकाच्या नावात सरकारनं पुन्हा बदल केला आहे. याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानपरिषदेत केली.
संभाजी महाराजांच्या या बलिदान स्थळाच्या विकास आराखड्यास सुधारित नाव आता ‘स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान स्थळ’ असे असणार आहे. याची घोषणा करताना फडणवीस म्हणाले, शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ मौजे तुळापूर, ता. हवेली, जिल्हा. पुणे व समाधीस्थळ स्मारक मौजे वढू बुद्रुक ता. शिरुर, जि. पुणे विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. या विकास आराखड्याच्या नावात अंशत: बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या विकास आराखड्याचे सुधारित नाव स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असे असणार आहे
ठाकरे सरकारने निश्चित केलेल्या या विकास आराखड्याच्या नावात बदल करुन शिंदे-फडणवीस सरकारनं पूर्वीचा ‘स्वराज्यरक्षक’ असा उल्लेख वगळून ‘धर्मवीर’ असा उल्लेख केला होता. पण काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात ‘धर्मवीर’ आणि ‘स्वराज्यरक्षक’ या दोन शब्दांवरुन वाद रंगला होता, राज्यभर आंदोलने देखील झाली होती. पण आता पुन्हा विकास आराखड्याच्या नावात बदल करण्यात आला आहे. या स्मारकाच्या ३९७ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला सरकारकडून मंजूरी देण्यात आली आहे.