(मुंबई)
हिवाळी अधिवेशनात बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले होते की, छत्रपती संभाजीराजेंना धर्मवीर म्हणू नका ते स्वराज्यरक्षक होते. यावरून भाजपने त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका केली होती. राज्यभर हा वाद चांगलाच गाजला होता. मात्र यानंतरही अजित पवार यांनी आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचे म्हटले होते.
छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक की धर्मवीर या वादावर छत्रपती घराण्याचे वंशज व भाजप खासदार उदयनराजे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यातील विविध पक्षातील नेत्यांकडून महापुरुषांबाबत काही वादग्रस्त वक्तव्ये केली जात असून यावरून वादंगही माजले आहे.
छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक आणि धर्मवीरही होते, असं विधान उदयनराजे यांनी केलं आहे. त्याबरोबरच शिवकाळात शिवाजी महाराज आणि त्यानंतर संभाजी महाराजांनी अनेक मशिदी आणि मंदिरांची निर्मिती केली. शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराजांनी कधीही कुठल्या धर्माचा अनादर केला नाही. त्यांनी आपापल्या काळात अनेक मशिदी आणि मंदिरं बांधली. त्यामुळे यावरून कुठलाही वाद करू नये. कारण दोघंही स्वराज्यरक्षक होते, त्यांनी सगळ्या धर्माचा आदर केला म्हणून ते धर्मरक्षकही होते, अशी प्रतिक्रिया उदयनराजे यांनी दिली. साताऱ्यातील शाही मशिदीची देखरेख छत्रपतींच्या देखरेखीखाली अजूनही केली जाते, असे विधान उदयनराजे यांनी केले.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांबाबत आक्षेपार्ह विधाने केली जात असून त्यावरून वाद निर्माण होत आहेत. यावर भाष्य करताना उदयनराजे म्हणाले, “ छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्म समभाव ही संकल्पना मांडली होती. त्यांनी काळात कुठल्याही जाती-धर्मातील लोकांसोबत भेदभाव केला नाही. मात्र प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या सोयीनुसार व मतांच्या राजकारणानुसार बोलत असतो. ”