(रत्नागिरी)
रत्नागिरी पालिकेच्या जिजामाता उद्यानाच्या सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते रविवारी (दि. ४ फेब्रुवारी २०२४) सायंकाळी ६ वाजता होणार आहे. राज्यातील सर्वात उंच छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे, बालशिवाजी व जिजामाता पुतळ्याचे अनावरण होणार आहे. अशी माहिती शुक्रवारी (दि. २ फेब्रुवारी २०२४) नगर पालिकेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी पत्रकार परिषदेत दिली
सोमवारी (ता. ५) सायंकाळी ६ वाजता विठुमाऊलींच्या मूर्तीचे अनावरण होईल. यावेळी राज्यातील तीन ते पाच हजार वारकरी दाखल होणार असून रिंगण, भजन आदी कार्यक्रम होणार आहेत, विठुमाऊलींच्या मूर्तीचे अनावरण सोहळ्याला मोठ्या संख्येने वारकरी संप्रदाय येणार असल्याने दिंडीचा दुपारी ३ वाजता मारुती मंदिर येथून प्रारंभ होणार आहे. याठिकाणी रिंगण केले जाणार आहे. दोन्ही सोहळ्यांसाठी रत्नागिरीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन देखील पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत व सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान जिल्हास्तर अंतर्गत रत्नागिरीत ही विकास कामे घेण्यात आली आहेत. यामध्ये जिजामाता उद्यान येथील सुशोभीकरण करणे या विकास कामाचा लोकार्पण सोहळा होणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार आहे. सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानअंतर्गत रत्नागिरी पालिकेचे शिर्के उद्यान सुशोभीकरण करणे या विकासकामाचा लोकार्पण सोहळा पालकंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सोमवारी (ता. ५) सायंकाळी ६ वाजता होणार आहे. दरम्यान या सोहळ्यानिमित्त स्वप्नील बांदोडकर यांच्या गीतांच्या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.