(छ. संभाजीनगर)
महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या ई बसची सेवा गुरुवारपासून छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातून सुरू झाली. जिल्ह्यातील पहिली ई बस ४५ प्रवाशांना घेऊन पुण्याकडे रवाना झाली. एसटी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या बसचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी प्रादेशिक व्यवस्थापक विभाग नियंत्रक, विभागीय वाहतुक अधिकारी उपस्थित होते.
या शिवाई ई बसमध्ये वायफाय, सहा सीसीटीव्ही कॅमेरे, दोन मोठ्या स्क्रीन प्रत्येक आसनाजवळ स्वतंत्र लाईट, मोबाईल चार्जिंग करण्यासाठी प्लग अशा सर्व सुविधा या बसमध्ये देण्यात आल्या आहे. विशेष म्हणजे फक्त ७० टक्के चार्जिंग मध्ये ही बस छत्रपती संभाजी नगर ते पुणे अंतर पूर्ण करते. तसेच महिलांसाठी सुद्धा या बस मध्ये ५० टक्के आरक्षण देण्यात आले आहे.
या बसचे तिकीट भाडे ५१५ रुपये इतके आहे. शिवशाही बसला देखील एव्हढेच तिकीट भाडे आहे. मात्र शिवनेरी बसला ७५० रुपये इतके तिकीट भाडे आहे. ही बस दीड तासात फुल चार्ज होते आणि या चार्जिंगवर बस २६० किमी धावते. या बसची चाचणी घेतली गेली त्यावेळी पूर्ण प्रवासानंतरही ३० टक्के बॅटरी शिल्लक होती.