(मुंबई)
स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. या साठी त्यांची चाचपणी सुरू आहे. ते कोल्हापुरातून उभे राहण्यास इच्छुक आहेत. दरम्यान, यासाठी त्यांचा कल महाविकास आघाडीकडे असून आघाडीत प्रवेश घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहे. मात्र, स्वराज्य पक्षाऐवजी पक्ष प्रवेश करण्याचा पर्याय महाविकास आघाडीने दिल्याची माहिती आहे.
संभाजीराजे छत्रपती हे भाजपच्या मदतीने राष्ट्रपती नियुक्त खासदार झाले होते. यामुळे ते भाजपचे असल्याचा सर्वांचा समज आहे. संभाजी राजे २००९मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढले होते. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. दरम्यान, त्यांनी एकला चलोची भूमिका घेत स्वराज्य संघटनेची स्थापना करून समाजकार्य सुरू ठेवले होते. मात्र, सध्या ते लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. कोल्हापूरसह, नाशिक किंवा मारठवड्यातील एखाद्या मतदार संघातून निवडणूक लढण्यास ते इच्छुक आहेत. यासाठी त्यांच्या महाविकास आघाडीशी चर्चा सुरू असल्याचे समजते.
‘स्वराज्य’ संघटनेला ते महावीकस आघाडीचा घटक पक्ष बनवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, स्वराज्य संघटनेऐवजी पक्षप्रवेशाचा पर्याय त्यांना आघाडीकडून दिला गेला असल्याचेही समजते. त्यांच्या संघटनेला भाजपचा आशीर्वाद असल्याचा आरोप त्यांच्यावर होत होता. त्यामुळे महाविकास आघाडी त्यांच्याकडे संशयी भूमिकेतून पाहत असल्याने ते चर्चेला तयार नव्हते. मात्र, काही दिवसांपासूंन त्यांच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.
महाविकास आघाडीत जागा वाटपात स्पर्धा असल्याने त्यांना पक्षप्रवेशाची ऑफर दिली गेली आहे. दरम्यान, त्यांना कोणती जागा द्यावी या बाबत देखील चर्चा सुरू आहे. आमदार सतेज पाटील यांनी त्यांच्यासाठी पुढाकार घेतला आहे. या बाबत संभाजीराजे छत्रपती म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीबरोबर स्वराज्य संघटनेची चर्चा सुरू आहे. सध्या तरी आपली पसंती महायुती नव्हे, तर महाविकास आघाडी असून कोणत्या जागेवरून लढायचे हे लवकरच ठरेल, असे एका वृत्तपत्राशी बोलतांना संभाजी राजे म्हणाले.
कोल्हापुरात रविवार (दि. १४) संभाजीराजे छत्रपती यांच्या गटाचा भव्य मेळावा पार पडला. या मेळाव्याच्या माध्यमातून संभाजीराजे गट राजकीय दृष्ट्या सक्रिय झाल्याचे स्पष्ट झाले. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतून या मेळाव्यास उपस्थित असलेल्या संभाजीराजे गटाच्या कार्यकर्त्यांनी संभाजीराजे यांनी आगामी लोकसभा निवडणूकीच्या आखाड्यात उतरावं, अशी जोरदार मागणी केली.
संभाजीराजे छत्रपती यांच्या अनुपस्थितीमध्ये देखील हजारो कार्यकर्ते एकत्र येऊन हा भव्य मेळावा संपन्न झाला. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव संभाजीराजे यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता, मराठा आरक्षण व इतर विषयांच्या निमित्ताने राज्यभर फिरत असताना कोल्हापूरकडे थोडे दुर्लक्ष झाले, याची खंत व्यक्त करत आता मात्र कोल्हापुरात पूर्ण ताकदीने कार्यरत होणार आहे, असा विश्वास संभाजीराजे यांनी कार्यकर्त्यांना दिला. यामुळे संभाजीराजें कोल्हापूरातून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे दिसून येत आहे.