(खेड / इक्बाल जमादार)
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला वेग आलेला पाहायला मिळतोय. मात्र दुसरीकडे चिपळूण येथील वाशिष्टी नदीवरील बांधण्यात आलेल्या नवीन पुलावरील सळ्यांचा सांगाडा दिसू लागला आहे. दर्जाहीन कामामुळे वाहनचालक, नागरिक , प्रवासी वर्गाकडून ठेकेदाराने खाल्ली ‘खडी’, उरली फक्त ‘ सळी ‘ अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
पुलाचे काँक्रीटीकरण केलेला भाग उखडून रस्त्यावरील लोखंडी सळ्या दिसण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. काम करणाऱ्या ठेकेदाराच्या निकृष्ट कामाचा नमुना सामाजिक कार्यकर्ते राहुल कांबळे यांनी समोर आणला आहे.
गेल्या काही वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे वाशिष्टी नदीवरील बहादूरशेख नाका येथील पुलाचे काम संथ गतीने सुरू असल्याची ओरड होत होती. याबाबत सातत्याने सर्वसामान्यांसह राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आवाज उठवला होता. यानंतर पुलाच्या एका मार्गाचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र, काही दिवसातच या पुलावरील लोखंडी सळ्यांनी आपले डोके वर काढून दर्जाहीन काम झाल्याचे सळ्यांनीच स्पष्ट केले होते. याबाबत ओरड झाल्यानंतर पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने मलमपट्टी केली होती. मात्र, आता पुन्हा पुलावरील सळ्यां दिसू लागल्या आहेत. या सळ्यावरून एखादे वाहन गेल्यास वाहनाचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु पुलासारख्या ठिकाणी मजबूत काम न करता ठेकेदार दर्जाहीन काम करून जनतेच्या जीवाशी खेळत असतात. यातन हेच स्पष्ट होत आहे. या पुलावरील सळ्यांचे सांगाडे दिसण्याची ही दुसरी घटना आहे. अशा घटना सातंत्याने होत असतील तर ठेकेदारांवर गुन्हे का दाखल होत नाही?, एखाद्या वाहनाचा सळ्यांच्या गुंत्यात अडकून अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण? अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून येत आहे.
सदर प्रकार कामथे येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल कांबळे यांनी उघडक केला असून एकंदरीत ठेकेदार कंपनीच्या निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराचा चेहराच नागरिकांच्या समोर आणला आहे. या पुलावरील दुसरी घटना असल्याने वाहनचालक, नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकाराबाबत तातडीने राष्ट्रीय महामार्ग उपविभागाने संबधीत थुकपट्टी लावणाऱ्या ठेकेदारावर कार्यवाही करावी आणि पुलाचे काम दुसऱ्या ठेकेदाराला देऊन मजबूत पॅचवर्क करण्याच्या सूचना द्याव्या. अशी मागणी प्रसार माध्यमांतून कांबळे यांनी केली आहे.