(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी-नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी पाली गावातील परिसरात रस्त्याच्या एका बाजूची माती खणून ठेवण्यात आली आहे. हे काम गेल्या आठवड्यात सुरू झाले होते. आता ते अपूर्ण ठेवून बंद करण्यात आल्याने पावसात तेथे मातीचा चिखल झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांचा घराकडे जाण्या-येण्याचा मार्ग बंद झाला आहे. गणेशोत्सवात होणार्या या त्रासामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
रत्नागिरी-नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी पाली ग्रामीण रुग्णालयाच्याविरुद्ध बाजूला मोठय़ाप्रमाणावर माती पसरवून ठेवण्यात आली आहे. सर्वत्र चिखल झाला असून घराकडे येण्याचा मार्ग बंद झाला आहे. साठरे गावातील काही ठिकाणी रस्त्याच्या ऐका बाजूची माती खणण्याचे काम गेल्या आठवड्यात सुरू होते. ते आता बंद करण्यात आले आहे. तेथे १४ ते १५ फुट उंचीची मोठी खोल दरीसारखा भाग झाल्यामुळे लगतच्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेती, बागायती जमिनीत जाण्या-येण्याचा मार्गच बंद झाला आहे. ऐन हंगामातील शेतीची कामे थांबून नुकसान होत आहे. शिवाय चौपदरीकरण करताना आलेली माती, झाडांचे बुंधे, मोठे दगड ही घाण संपादन हद्दीच्या बाहेर शेतकर्यांच्या चांगल्या जागेत आणून टाकलेली असल्यानेही त्रास होत आहे.
येथील स्थानिक शेतकरी, जमीन मालक या गैरसोयीबाबत ठेकेदाराकडे बाजू मांडली होती. तसेच गणेशोत्सवात जाण्या येण्यासाठी तात्पुरता मार्ग करुन देण्याची विनंती केली. परंतू त्याकडे दुर्लक्ष केले गेले. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने तोडगा काढावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत.