(मुंबई)
सोन्या-चांदीचे दागिने, पैसे, गाड्या चोरीच्या घटना आपल्या आजूबाजूला नेहमीच घडत असतात. मात्र, मुंबईत चोरट्यांनी एक अनोखी चोरी करून चक्क प्राणी संग्रहालयावरच डल्ला मारला आणि तेथील अजगर, घोरपडी, पाली, सरडे चोरून नेले. मुंबईतील शिवाजी पार्क प्राणी संग्रहालयातून सरपटणारे प्राणीच चोरीला गेल्याची अजब घटना समोर आली आहे.
मुंबईतील शिवाजी पार्क येथील मरीन क्वा झूमध्ये हा प्रकार घडला आहे. प्राप्त माहितीनुसार, सहा अजगरांसह दोन घोरपडी, एक पाल आणि एक सरडा चोरट्यांनी चोरून नेला आहे. चोरीला गेलेले सर्व प्राणी परदेशी जातीचे आहेत. शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात प्राणी संग्रहालयाच्या विश्वस्तांच्या तक्रारीनंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरी झालेल्या प्राण्यांची किंमत साडेचार लाख रुपयांच्या घरात असल्याचे सांगण्यात आले.
प्राणी संग्रहालयातील अनधिकृत बांधकामावर सोमवारी मुंबई महापालिकेची तोडक कारवाई करण्यात आली. झू मधील अनधिकृत बांधकाम तोडताच एक्झॉटिक एनिमल चोरीला गेले आहेत. प्राणी संग्रहालयावरील कारवाई मागे राजकीय सूडबुद्धी असल्याचा प्राणी संग्रहालय प्रशासनाचा आरोप केला आहे. प्राणी संग्रहालयाच्या शेजारी असलेल्या पालिकेच्या जलतरण तलावामध्ये मगरीचे पिल्लू सापडल्यानंतर प्राणी संग्रहालय चर्चेत आलं होतं. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्राणी संग्रहालयातससा, कोकेटेल, मलार्ड डक्स, कार्पेट पायथन (14 फूट वाढतो), बॉल पायथन (6 फूट वाढतो), अर्जेंटिना टाग्यू घोरपड, ब्ल्यू टंग स्किंग ( साप सुरळी), एम्पेरोर विंचू, इग्वाना, बंगाल मार्बल मांजर, रेड आयड स्लायडर कासव हे प्राणी आणि पक्षी तसेच अलिगेटर गार, अरोवना, फ्लॉवर हॉर्न, परोट फिश, पिराना, angel’s, हे मासे या प्राणी आहेत.