(संगमेश्वर /प्रतिनिधी )
वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी नर्मदा परिक्रमा करणे हे जरी आव्हानात्मक असले तरी अशक्य नव्हते . पाध्ये गोळवलकर घराण्यात साहस हे परंपरागत असल्याने परिक्रमा पूर्तीची खात्री होती . परिक्रमेने काय प्राप्त झाले , हे सांगण्यापेक्षा परिक्रमा हा अनुभवण्याचा विषय असल्याचे चैतन्य पाध्ये याने आपल्या अनुभव कथनात स्पष्ट केले .
अप्पा पाध्ये यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले . चैतन्यच्या विविध पैलूंचा त्यांनी यावेळी आढावा घेतला . विवेक पाध्ये यांनी देखील यावेळी अत्यंत सोप्या भाषेत स्वरचित कविता सादर करुन आपल्या ओघवत्या भाषेत विवेचन केले . विवेक पाध्ये यांनी तयार केलेल्या कमळाच्या चलतचित्रातून चैतन्य पाध्ये याचे अनुभव कथनासाठी आगमन झाले . हा सोहळा पाहताना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले . निबंध कानिटकर आणि श्रीनिवास पेंडसे यांनी चैतन्यच्या नर्मदा परिक्रमेचा ओंकारेश्वर ते परत ओंकारेश्वर अशा साडेपाच महिन्यांच्या आणि ३२५० किमी लांबीच्या पायी प्रवासाचा हळूवार आढावा घेतला . या प्रश्नोत्तररुपी अनुभव कथन कार्यक्रमामुळे उपस्थितांना परिक्रमा समजू शकली .
या कार्यक्रमात उपस्थितांच्या स्वागतासाठी चंद्रकांत यशवंत इंदुलकर यांनी सलग ३ तास १५ मिनीटे एकाच जागेवर उभे राहून जिवंत पुतळा होत नमस्कार करण्याची कृती केली . कार्यक्रमाच्या अखेरीस इंदूलकर जेंव्हा आपली पुतळ्याची भूमिका सोडून चैतन्यच्या स्वागतासाठी उतरले तेंव्हा उपस्थित श्रोते चकित झाले आणि सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटाने त्यांच्या केलेला दाद दिली . सलग ५ तास १५ मिनिटे स्तब्ध्द उभे राहून जिवंत पुतळा साकारण्याची चंद्रकांत इंदुलकर यांची क्षमता आहे . अखेरीस नर्मदा मैय्याची आरती करण्यात आली . निहाल गद्रे हिने गायलेल्या पसायदानाने उपस्थित मंत्रमुग्ध झाले . उपस्थित सर्वांना भोजन प्रसादाचे वाटप झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली . एकूणच सर्व कार्यक्रम दृष्ट लागण्याजोगा झाला .