(चेन्नई)
आयपीएल 2023 च्या २९व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादचा ७ विेकेट्सनी पराभव केला. हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळला गेला. १३४ धावांचे लक्ष्य चेन्नईने १८.४ षटकांतच लक्ष्य गाठले. रवींद्र जडेजाची अचूक गोलंदाजी आणि डेव्हॉन कॉनवेच्या अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईने सहजपणे हैदराबादवर विजय साकारला. चेन्नईने हैदराबादच्या धावांवर अंकुश ठेवला. त्यामुळे त्यांना फक्त १३४ धावा करता आल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना कॉनवेने अर्धशतक झळकावले आणि चेन्नईला सात विकेट्स राखून मोठा विजय मिळवून दिला.
चेन्नईपुढे १३५ धावांचे हैदराबादचे माफक आव्हान होते. पण कधी कधी माफक आव्हान असले तरी त्याचा पाठलाग करताना संघाला सुरुवातीला धक्के बसल्याचे पाहायला मिळते. पण यावेळी मात्र तसे झाले नाही. कारण यावेळी ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांनी धडाकेबाज फटकेबाजी केली. ऋतुराजपेक्षा कॉनवे जास्त आक्रमक असल्याचे पाहायला मिळाले. या दोघांनी ११ षटकांत ८७ धावांची सलामी दिली होती. त्यामुळे हे दोघे आता संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब करतील, असे वाटत होते. पण यावेळी ऋतुराज दुर्दैवीपणे धावचीत झाला.
ऋतुराजला यावेळी ३० चेंडूंत २ चौकारांच्या जोरावर ३५ धावा करता आल्या. ऋतुराज बाद झाला असला तरी कॉनवे मात्र दमदार फटकेबाजी करत होता. कॉनवेने यावेळी आपले अर्धशतकही पूर्ण केले. ऋतुराजनंतर अजिंक्य रहाणे फलंदाजीला आला पण त्याला ९ धावांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर रायडूही लवकर बाद झाला. मात्र, दुसरीकडे कॉनवे जोरदार फटकेबाजी करीत होता. अखेर १९ व्या षटकात मोईन अलीने चौकार ठोकला आणि विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी धोनीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करायचा निर्णय घेतला आणि त्यांच्या गोलंदाजांनी कर्णधाराचे शब्द खरे करून दाखवले. हैदराबादच्या संघाने चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. हॅरी ब्रुक्सने काही फटके चांगले मारले खरे, पण आकाश सिंगने त्याला १८ धावांवर बाद केले आणि हैदराबादला पहिला धक्का बसला. त्यानंतर अभिषेक वर्मा हा चांगली फलंदाजी करत होता. पण यावेळी रवींद्र जडेजाने त्याला ३५ धावांवर बाद केले आणि चेन्नईला मोठे यश मिळवून दिले. त्यानंतर त्याने राहुल त्रिपाठीलाही २१ धावांवर बाद केले. जडेजाने मयांक अगरवालला चांगलेच चकवले आणि धोनीकरवी त्याला यष्टीचीत केले. हैदराबादच्या फलंदाजांना यावेळी योग्य लय सापडलीच नाही. त्यामुळे त्यांना यावेळी मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
गुणतालिकेत सीएसके तिसऱ्या स्थानी
चेन्नईचा या मोसमातील सहा सामन्यांमधील हा चौथा विजय आहे. संघाने दोन सामने गमावले आहेत. चेन्नईचा संघ आठ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. राजस्थान आणि लखनौ सुपरजायंट्ससह त्यांचे समान गुण आहेत, परंतु राजस्थानचा नेट रनरेट सर्वोत्तम आहे आणि यामुळे राजस्थान अव्वल आहे. लखनौ दुसऱ्या तर चेन्नई तिसऱ्या क्रमांकावर आहे.