(जैतापूर)
मोलमजुरी आणि चिरेखाणीवर काम करणाऱ्या मजुराच्या मुलाची अग्निवीर सैनिक प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. राजापूर तालुक्यात गेल्या 30 वर्षांपेक्षा अधिक काळ वास्तव्यास असलेल्या आणि सध्या नाटे येथे राहत असलेल्या चिरेखाण कामगार विठ्ठल कल्लापा गुगद्धडी यांच्या मुलाची भारत सरकारच्यावतीने नव्याने सुरू करण्यात आलेल्या अग्निवीर सैनिक प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे.
मूळ कर्नाटक येथील असलेल्या प्रथमेश याला महाराष्ट्रातील निवड प्रक्रियेत सहभाग घेताना अनेक अडचणींना सामना करावा लागला होता. मात्र अनेकांच्या सहकार्यामुळे या अडचणींवर मात करता आल्याचे त्याने म्हटले आहे.
खर म्हणजे पोलीस भरतीसाठी गेल्या साडेतीन वर्षांपासून मेहनत घेत होता. सागरी पोलीस ठाणे नाटेच्यावतीने आणि गोपनीयतेचे काम करणारे पोलीस दीपक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण मेहनत घेत होतो. त्यानंतर भारत सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या अग्निवीर सैनिक म्हणून काम करता यावं यासाठी ही आपण मेहनत घेत होतो आणि त्यानंतर निवड प्रक्रियेत सहभागी झालो. निवड प्रक्रियेतील सर्व टप्पे पार करत आपली निवड झाली आहे त्याबद्दल आनंद होत असल्याचे त्याने म्हटले आहे.
अत्यंत गरिबीत आणि काबाडकष्ट करत आपल्या आई-वडिलांनी आपल्याला शिक्षण दिले आहे. तसेच तालुक्यात सर्वच लोकांनी आपल्याला आपल्या कुटुंबाला नेहमी सहकार्य केले आहे. या सर्वांमुळे आपल्याला देशसेवेची संधी प्राप्त होत असल्याने आपल्याला खूप आनंद होत असल्याचे त्याने म्हटले आहे.
आपल्याला जैतापूर ,नाटे, आडीवरे या भागातील अनेक लोकांनी मार्गदर्शन आणि सहकार्य केले आहे, त्यांचे याप्रसंगी त्याने आभारी मानले आहेत. मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबाच्या मुलाच्या अग्निवीर सैनिक निवडीबद्दल परिसरातून अभिनंदन होत आहे.