(चिपळूण / प्रतिनिधी)
चिपळूण शहरावर लाल व निळी पूर रेषा लादण्यात आली आहे. यापुढे रेषेमुळे शहराचे अस्तित्वच नष्ट होणार आहे. आमदार शेखर निकम यांनी हा विषय सभागृहात बुधवारी मांडल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी चिपळूणवासीयांना दिलासा देत लवकरच या महत्त्वाच्या विषयाबाबत मुख्यमंत्रीना एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले. चिपळूण नगरपरिषद व शहरातील निळी रेषा व लाल रेषा यापुढे रेषा आखण्याचे काम शासनाच्या जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे. या रेषाची आखणी झाल्याने शहराचा सुमारे ९० टक्के भाग बाधित झाला आहे. त्यामुळे विकासात्मक कामे करता येत नाही तरी गुजरात राज्य सरकारने पुररेषा बांधकाम निर्बंध कायद्यामध्ये अमेंडमेंट करून अटी व शर्तीवरती बांधकाम परवानगी देण्याचे नियम व धोरण अवलंबले आहे. याच पद्धतीने महाराष्ट्र शासनाने सुद्धा विचार करावा, अशी मागणी करण्यात आली.
परिषदेची इमारत बांधण्याचा प्रस्ताव
चिपळूण शहरालगत असलेल्या वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्यासाठी आवश्यक असणारा निधी सरकारकडून मिळाला पाहिजे. तो न मिळाल्यामुळे गाळ काढण्याचे काम रखडले आहे. तरी आवश्यक निधी वितरित करावा अशी मागणी त्यांनी केली. कोळकेवाडी धरणातून चिपळूण शहरासाठी ग्रॅव्हिटी योजनेतून तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. त्याला तातडीने प्रशासकीय मान्यता मिळावी, चिपळूण नगर परिषदेची इमारत जुनी झाल्याने नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. त्याला मान्यता द्यावी.