(देवरूख / सुरेश सप्रे)
राजकीय घडामोडीच्या पाश्र्वभूमीवर चिपळूण विधानसभा मतदारसंघावर महाआघाडीतील राष्ट्रवादी (शरद पवार गट) काँग्रेसच निवडणूक लढणार असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस व रत्नागिरी जिल्हा निरीक्षक बबन कनावजे यांनी देवरुख येथे पत्रकारांशी बोलताना केल्याने उबाठा सेनेत खळबळ उडाली असून तर्कविर्तकांना उत आला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत या मतदार संघातून महाआघाडीतर्फ राष्ट्रवादी काँग्रेसच निवडणूक लढविणार असून लवकर पक्षाचे संस्थापक शरद पवार हे उमेदवाराची घोषणा करतील असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा निरिक्षक बबन कनावजे यांनी जाहीर केले.
उबाठा शिवसेनेत उमेदवारीसाठी स्पर्धा निर्माण झाली असतानाच आहे. गुहागरचे आ. भास्कर जाधव की माजी आ. सुभाष बने यांचे चिरंजीव माजी जि. प. अध्यक्ष रोहन बने यांच्यामध्ये पक्षांतर्गत स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेनेचा चेहरा कोण? याबाबत उत्सुकता असतानाच या दाव्याने महाआघडीत गोंधळ निर्माण होवू शकतो.
आजच्या फाटाफूटीनंतर राजकारणात चिपळूण विधानसभा मतदारसंघातील चुरस चर्चीली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी बंड करत सत्तेत सहभागी झाले. त्या आ. शेखर निकम यांनी दादांसोबत रहाण्याचा निर्णय घेतला. सध्या ते अजीत पवार गटाचे आमदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी मतदारसंघात कोट्यवधीची विकासकामे केली आहेत. प्रत्येक जि. प. गटामध्ये कोटीची कामे करण्यामध्ये आ. निकम यांना यश आले आहे. त्यामुळे या मतदारसंघात विद्यमान आ. निकम हेच महायुतीकडून विधानसभा उमेदवार असणार आहेत. फक्त त्यांच्याविरोधात निवडणूक लढविणार हे मात्र स्पष्ट झालेले नाही.
चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघातून गुहागरचे आ. भास्कर जाधव यांनी उमेदवारी लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी चिपळूण- संगमेश्वर तालुक्यात दौरा देखील केला. गणेशोत्सवात दिवाळीमध्ये गाठीभेटी घेतल्या, तर काही ठिकाणी सभाही झाल्या. त्यामुळे आ. जाधव या मतदारसंघातून इच्छुक आहेत. दिवाळीमध्ये त्यांनी सर्वपक्षीय कार्यकर्ते व जुन्या सहकाऱ्यांना दिवाळीच्या मुहूर्तावर एकत्र केले होते.
दुसऱ्या बाजूला माजी आ. सुभाष बने यांचे सुपुत्र व माजी जि. प. अध्यक्ष रोहन बने यांनीदेखील चिपळुणात गाठीभेटी घेतल्या आहेत. रोहन बने यांच्या वाढदिवसानिमित्त चिपळूणमध्ये देखील शिवसैनिकांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेतला. देवरूख मध्ये कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचेच शेखर निकम यांनी शिवसेनाला धोबीपछाड देत विजय मिळविला होता. त्यामुळे मतदारसंघावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचादेखील दावा असणार आहे.
मात्र, महाआघाडीत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवार पुढे येतो हे पाहणे महत्वपूर्ण ठरणार आहे. निकम यांचे विरोधातील चेहरा कोण? या बाबत मात्र चिपळूण संगमेश्वरमध्ये जोरदार चर्चा सुरु झाली आहे.