(चिपळूण)
राज्य उत्पादन शुल्क् विभागाच्या चिपळूण विभागाकडून राष्ट्रीय महामार्गावर अचानक वाहन तपासणी करताना चिपळूण रेल्वे स्टेशन फाट्याजवळ ६८.४२ लाखांचे विदेशी मद्य तसेच वाहन, कोळसा पावडर, मोबाईल आदींसह ९२,६२,५०० रूपयांचा माल जप्त करण्यात आला.
राज्य उत्पादन शुल्क चिपळूण विभागाने मिळालेल्या माहितीनुसार २५ मे रोजी वालोपे गावच्या हद्दीत चिपळूण रेल्वे स्टेशन फाटयाजवळ सापळा रचला. दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास चिपळूणकडून पनवेलच्या दिशेने येणा-या पांढ-या रंगाच्या ट्रकची (क्र. एमएच ०९-एफ एल ५७२४) झडती घेतली असता मागच्या बाजूला सुमारे २० किलो क्षमतेच्या कोळसा पावडरने भरलेल्या एकूण १२५ पॉलिथीन गोणी तसेच त्यांच्या आड कागदी पुठ्याचे बॉक्स दिसले. त्या बॉक्समध्ये ऑरेंज फ्लेवर व्होडका आणि ग्रीन अँपल व्होडका या दोन ब्रॅंडच्या (७५० मिली क्षमतेच्या) एकूण ९५० बाॅक्समध्ये ९९,४०० सीलबंद बाटल्या आढळल्या.या विदेशी मद्याची अंदाजे किंमत ६८, ४०,००० रूपये व ट्रकची अंदाजे किंमत २४ लाख, कोळसा पावडर (९९,५०० रूपये) व ९० हजार रूपये किंमतीचा मोबाईल असे एकूण ९२,६२,५०० रूपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले.
विदेशी मद्याचा साठा बेकायदेशीपणे महाराष्ट्र शासनाचा कर बुडवून वाहतूक करीत असल्याचे दिसून आल्याने ट्रकचालक सुरेश हरिबा पाटील (रा. शिवाजीनगर कडेगाव ता. कडेगाब जि.सांगली) याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.