शहरातील मार्कंडी येथील काेराेना प्रतिबंधक लसीकरण केंद्रावर नागरिकांची माेठी रिघ लागली आहे. त्यामुळे येथे हाेणारी गर्दी पाहून काेराेनाचा धाेका वाढण्याची भीती नागरिकांना वाटू लागली आहे. यासंदर्भातील एक व्हिडीओ व फाेटाे जागरुक नागरिकांनी पाठवले असून जिल्हा प्रशासनाने यावर ताेडगा काढून लसीकरण केंद्र वाढवावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सध्या लसीकरणचा दुसरा टप्पा चालू आहे. यामध्ये 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरु आहे. लसीकरण केंद्रावर होणारी नागरीकांची गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने २२ एप्रिल पासून ऑनलाईन कोविन संकेतस्थळावरुन किंवा आरोग्य सेतू अँपवरुन नोंदणी करुन लसीकरणासाठी यावे, असे निर्देश दिले आहेत. तरीही नागरीक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. सामाजिक अंतराचे पालन होत नाही. याकडे जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी हाेत आहे.