( चिपळूण )
शहरातील दुचाकी चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करून चिपळूण पोलिसांनी काही तासात अटक केलेल्या अजय कृष्णा कदम याला चिपळूण न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर करत त्याची सुटका केली आहे. आरोपीच्या वतीने जेष्ठ वकील ॲड. संदेश उर्फ बंटी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. पायस पूजा राजेंद्र कडईकर यांनी युक्तिवाद केला. हा युक्तिवाद ग्राहय धरत न्यायमूर्ती पी. आर. कुलकर्णी यांनी अजय कदम याला जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले. चिपळूण शहरातील खंड येथील समीर रामकृष्ण चिखले यांची दुचाकी रविवारी दुपारी चोरीस गेली होती. याबाबत त्यांनी तात्काळ चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
दरम्यान चिपळूणचे पोलीस शहरातील पाग परिसरात गस्त घालत असताना त्यांना एक तरुण दुचाकी चालवत असल्याचे व पोलिसांना बघून तो काहीसा गोंधळल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्याला विचारणा केली असता तो उलटसुलट उत्तरे देऊ लागला. तसेच चोरीस गेलेल्या दुचाकीच्या नंबरची खात्री करता ही तीच दुचाकी असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ अजय कृष्णा कदम याला अटक करून गुन्हा दाखल केला होता. सोमवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. तेव्हा पोलिसांनी एक दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाकडे मागितली.
मात्र आरोपीचे वकील पायस कडवईकर यांनी त्याला जोरदार आक्षेप घेतला. आरोपीला रविवारी रात्री १०.५५ वजता अटक केलेली आहे. सोमवारी दुपारपर्यंत तपासासाठी पोलिसांकडे पुरेसा वेळ होता. तसेच मुद्देमाल देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. त्यामुळे अधिक तपासाची आवश्यकता नाही, असा जोरदार युक्तिवाद ऍड. कडवईकर यांनी न्यायालयासमोर केला.
हा युक्तिवाद न्यायालयाने ग्राहय धरत पोलिसांची पोलीस कोठडीची मागणी फेटाळून लावली आणि न्यायालयीन कोठडीचे आदेश दिले. आरोपीच्या वतीने तात्काळ जेष्ठ विधिज्ञ ॲड. संदेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड कडवईकर यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला. तो न्यायालयाने मंजूर करून अंतरिम जामीन मंजूर केला.