( चिपळूण / प्रतिनिधी )
शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या चिपळूण येथील घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याप्रकरणी ठाकरे गट आक्रमक झाला आहे. शेकडो शिवसैनिकांनी चिपळूण पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत पोलिसांनाच घेराव घातला.
नितेश राणे यांच्या चिथावणीमुळेच हल्ल्याचा प्रयत्न झाला, असा आरोप करत शिवसैनिकांनी राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच, रात्री हा प्रकार होऊनही पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केला नाही, याचा निषेध करत शिवसैनिकांनी पोलिसांविरोधात घोषणाबाजी केली.
भास्कर जाधव यांची सुरक्षा तातडीने वाढवण्याची मागणीही शिवसैनिकांनी केली आहे. चिपळूण पोलिस स्टेशनमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. पोलिसांनी तातडीने याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करावी व युद्धपातळीवर तपास करावा, अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे.
अद्याप गुन्हा दाखल नाही
शिवसैनिकांनी पोलिसांना सांगितले की, भास्कर जाधव यांच्यातील संघर्षातूनच मध्यरात्री हा हल्ला झाला आहे. त्यामुळे आमचीच फिर्यादी म्हणून नोंद करत राणेंविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे.
दरम्यान आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला प्रकरणात शिवसैनिकांनी भाजपचे परिमल भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. परिमल भोसले यांना पोलीस ठाण्यात आणलं आणि तातडीने सोडलं याचे गाैडबंगाल काय असा जाब शिवसैनिकांनी पाेलिसांना विचारला. सध्या सर्व शिवसैनिक पाेलिस ठाण्यात ठाण मांडून बसले आहेत.