(चिपळूण)
महाराष्ट्र शासनाचा कोकण विभागीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार मिळाल्याबद्दल चिपळुणातील सहेली ग्रुपचा चिपळूण नगर पालिकेमार्फत विशेष सन्मान करण्यात आला. हा सन्मान सोहोळा मंगळवार दि. 28 मार्च रोजी शहरातील स्व. बाळासाहेब ठाकरे शॉपिंग सेंटर येथे पार पडला.
नगर पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी प्रसाद शिंंगटे यांच्या हस्ते शाल, सन्मानपत्र, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सहेली ग्रुपच्या शिलेदार माजी नगरसेविका सौ. सीमाताई रानडे व सहकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. सहेली ग्रुप शहरामध्ये महिला व बालकल्याण क्षेत्रात गेली अनेक वर्ष महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील उल्लेखनीय कामगिरी करीत आहे.
संस्थेच्या वैशिष्ट्यपूर्ण कार्याची दखल घेवून महाराष्ट्र शासनाचा कोकण विभागीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने संस्थेला गौरविण्यात आले आहे. त्यांचा हा सन्मान चिपळूणच्या नावलौकिकमध्ये भर घालणारा असून समस्त चिपळूणवासियांसाठी अभिमानास्पद व अभिनंदनीय आहे. त्यामुळे संस्थेच्या प्रेरणा देण्यासाठी चिपळूण नगर पालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत मंगळवारी सहेली ग्रुपच्या सर्व पदाधिकारी, सदस्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे, कार्यालयीन अधिक्षक अनंत मोरे, महिला व बालकल्याण विभाग प्रमुख प्रसाद उर्फ बापू साडविलकर, राजू खातू, वैभव निवाते, महेश जाधव आदी आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
फोटो – सहेली ग्रुपच्या शिलेदारांचा सन्मान करताना मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे सोबत बापू साडविलकर व अधिकारी, कर्मचारी.