( चिपळूण /प्रतिनिधी )
चिपळूण अर्बन बँकेत अपहार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. एका कर्मचाऱ्याने पदाचा गैरवापर करून ऑनलाईन पद्धतीने रक्कम लंपास करीत अपहार केल्याची माहिती बँकेच्या अध्यक्षा राधिका पाथरे यांनी बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत दिली. याप्रकरणी चौकशी सुरु असून लवकर पोलिसात तक्रार देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच सभासदांनी घाबरू नये, सभासदांचे एक रुपयाचेही नुकसान होणार नाही, अशी ग्वाही सौ. पाथरे यांनी या वेळी दिली.
चिपळूण अर्बन बँकेची ८९ वी सर्वसाधारण सभा अध्यक्षा सौ. राधिका पाथरे यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील राधालाई लाड सभागृहात आयोजित केली होती. या सभेत सौ. पाथरे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना बँकेत एका कर्मचाऱ्याने केलेल्या अपहाराची माहिती सभासदांना दिली. बँकेच्या आयटी विभागात ऑनलाईन व्यवहाराची परिपूर्ण माहिती असलेल्या या कर्मचाऱ्याने खातेदारांच्या खात्यातील रक्कम परस्पर अन्य खात्यात ऑनलाईन पद्धतीने वळविली. हा प्रकार त्याच दिवशी इतर बँक कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच तत्काळ त्याची चौकशी सुरू केली. त्याप्रमाणे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात फॉरेन्सिक ऑडीट रिपोर्ट उपलब्ध होणार आहे. त्यानुसार पुढील प्रक्रिया केली जाणार आहे. सबंधित कर्मचाऱ्याने अपहाराबाबतची कबुली दिली आहे. त्याच्याकडून काही प्रमाणात रक्कम वसूल केली आहे. परंतु त्या व्यतिरिक्त अन्यकाही अपहार झाला आहे का? याचीही खातरजमा केली जात आहे. तसेच रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार नाममात्र सभासद असणाऱ्यांना १ लाखापेक्षा अधिक कर्ज देता येत नाही. परंतु तसे कर्ज वाटप झाल्याने आरबीआयने २ लाख रूपयांचा दंड केला असल्याचेही पाथरे यांनी सांगितले.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष देसाई म्हणाले, बँकेला २०२१-२२ या आर्थिक वर्षात एकूण ५ कोटी ९८ लाख २७ हजार रूपयांचा ढोबळ नफा, तर १ कोटी ९५ लाख २१ हजार रूपयांचा निव्वळ नफा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत निव्वळ नफ्यामध्ये ४३.२९ टक्के घट झाली आहे. बँकेने पतसंस्थांच्या ठेवी स्वीकारणे बंद केले आहे. याशिवाय अलिकडे कर्जाची मागणीही घटली आहे. त्यामुळे बँकेचा सर्वसाधारण आर्थिक समतोल साधण्यासाठी संचालक मंडळाने ठेवीवरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला. या आर्थिक वर्षात भागधारकांना ६ टक्के लाभांश जाहीर केला असून सभा संपताच तो त्यांच्या खात्यात जमा होईल. यानंतर बँकेच्या नूतन इमारतीविषयी माहिती देण्यात आली. सुमारे सहा कोटीची ही इमारत उभारण्यात येणार असून निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले.
या सभेला उपाध्यक्ष निहार गुडेकर, संचालक संजय रेडीज, अनिल दाभोळकर, सतिश खेडेकर, दिलीप दळी, डॉ. दीपक विखारे, मोहन मिरगल, मंगेश तांबे, रहिमान दलवाई, समीर जानवलकर, निलेश भुरण, गौरी रेळेकर यांच्यासह सभासद उपस्थित होते.