(चिपळूण)
केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिला वर्ग अडचणीत आले आहेत. महागाईचा भडका सुरूच आहे. त्याशिवाय ईडी व सीआयडीच्या माध्यमातून विरोधकांवर दबावतंत्राचा वापर केला जात आहे. त्यातून लोकशाही धोक्यात आल्याने मोदी सरकार विरोधात येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे जोरदार थाळीनाद करण्यात आला. यानिमीत्त शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोर राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) पदाधिकारी गुरूवारी सकाळी मोठ्या संख्येने एकवटले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांच्या विरोधात ईडीच्या कारवाईचा सिलसीला सुरू आहे. त्यामुळे येथील कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर उतरुन निषेध केला आहे. तासभर सर्व पदाधिकाऱी ठिय्या मांडून होते. यावेळी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. .
यावेळी माजी आमदार रमेश कदम व राष्ट्रवादीचे नेते प्रशांत यादव म्हणाले, महाराष्ट्र हा शिव- शाहू- फुले- आंबेडकरांची पुरोगामी विचारधारेने बनलेला भाग आहे. परंतू या ना त्या कारणाने महाराष्ट्रात राजकारणाच्या नावाखाली शासकीय यंत्रणेचा वापर सुरू आहे. आमदार रोहित पवार यांच्या बाबतीतही असेच घडत आहे. रोहीत पवार हे त्यांच्या मतदार संघापुरतेच मुद्दे मांडत नाहीत, तर राज्यातील विविध घटकांचे मुद्दे ते आक्रमकपणे मांडतात. आमदार म्हणून विधान सभेत आणि रस्त्यावरची लढाई ही आमदार रोहित पवार हे लढत आहेत.
राज्यातील युवांच्या प्रश्नावर नुकतीच त्यांनी पुणे ते नागपूर अशी तब्बल ८०० किलो मिटर अधिक लांबीची युवा संघर्ष यात्रा काढून त्याकडे सरकारचे लक्ष वेधले. सोबतच शेतकरी, महिला, कामगार, बेरोजगार यांचे मुद्देही आक्रमकपणे मांडले. युवा संघर्ष यात्रेच्या समारोपाला तर त्यांचा आक्रमकपणा आणि त्यांना मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद संपूर्ण राज्याला बघायला मिळाला. पक्षातील पहिल्या फळीतील अनेक नेते सत्तेत सहभागी झाले असले तरी आमदार रोहित पवार हे न डगमगता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या गटाची भूमिका ठामपणे आणि मुद्देसूदपणे मांडत आहेत. यामुळेच घाबरलेल्या सरकारने त्यांच्या मागे आता चौकशीचा ससेमिरा लावला आहे.
केवळ त्रास देण्याच्या हेतूनेच या सरकार कडून आमदार रोहित पवार यांची चौकशी करत असून लोकांचे प्रश्न विचारणाऱ्याला जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. या विरोधातच हे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून त्यांनी आक्रमकपणे सरकार विरोधात घोषणाबाजी निषेध केला.
यावेळी माजी आमदार रमेश कदम, विधानसभा उमेदवार प्रशांत यादव, तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर, महिला जिल्हाध्यक्षा दिपिका कोतवडेकर, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष रईस अल्वी, माजी नगराध्यक्ष सुचय रेडीज, अजमल पटेल, जिल्हाउपाध्यक्ष दत्ता पवार, जिल्हाचिटणिस रोहन चौधरी, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष महमद पाते, ओबीसी तालुकाध्यक्ष विलास चिपळूणकर, वडार समाजाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष हिंदुराव पवार, महिला तालुकाध्यक्ष राधा शिंदे, शहराध्यक्ष रतन पवार, युवक शहराध्यक्ष श्रीनाथ खेडेकर, कार्याध्यक्ष शिरीष काटकर, महीला कार्याध्यक्षा अंजली कदम, फैसल पिलपिले, गुलझार कुरवले, राकेश दाते, अन्वर जबले, वासुआप्पा मेस्त्री, सुधीर जानवलकर, यतिश कडवाईकर आदी उपस्थित होते.