( चिपळूण / प्रतिनिधी )
तालुक्यातील खेर्डी-मोहल्ला येथे लग्न सोहळयानिमित्त मेहंदीच्या कार्यक्रमात नाचताना शुल्लक कारणावरुन बाप बेटयाला 8 जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना शनिवार 10 डिसेंबर रोजी रात्री 9.30 ते 10 वाजण्याच्या सुमारास घडली. या मारहाण प्रकरणी 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुसा आदम चौगुले, मुनीर आदम चौगुले, दानिश मुसा चौगुले, समद मुसा चौगुले, समीर इसाक सकवारे, अजर रहिमान सकवारे, मुबारक रहिमान सकवारे, आदम शरफुद्दीन चौगुले (सर्व रा. खेर्डी मोहल्ला, चिपळूण) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नाव आहे. याबाबतची फिर्याद इलियास उस्मान चौगुले (50, खेर्डी मोहल्ला, चिपळूण) यांनी पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार 10 डिसेंबर रोजी रात्री 9.30 वाजता ते 10 च्या सुमारास लियाकत सुलेमान चौगुले यांच्या मुलीचा खेर्डी-मोहल्ला येथे लग्नानिमित्त मेहंदीचा कार्यक्रम सुरु होता. या कार्यक्रमात इलियास चौगुले व त्याचा मुलगा कबीर दोघेही आले होते. मेहंदीच्या कार्यक्रमात दोघेही नाचत होते.यावेळी कबीर याच्या खांद्यावर फारुख याने हात मारला. याबाबत इलियास चौगुले यांनी विचारणा फारुख याला विचारणा केली. विचारणा केल्याचा राग आल्याने मुसा चौगुले, मुनीर चौगुले, दानिश चौगुले, समद चौगुले, समीर सकवारे, अजर सकवारे, मुबारक सकवारे, आदम चौगुले या सर्वांनी इलियास चौगुले व त्याचा मुलगा कबीर याला लग्नाच्या मंडपात लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच मंडपाबाहेर अंधारातही त्या दोघांना मारहाण केली. तसेच संशयित आदम चौगुले याने इलियास चौगुले यांना ‘मंडपात कशाला लपतोस, तुझा आतडा बाहेर काढतो ‘ असे म्हणत धमकी दिली. या प्रकरणी इलियास चौगुले यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार 8 जणांवर भादविकलम 143, 149, 323, 504, 5036 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.