(चिपळूण)
चिपळूण तालुक्यातील कुंभार्ली गणेशवाडी येथे दरवाजाचे कुलूप तोडून बेडरुमच्या खोलीतील लोखंडी कपाटात ठेवलेल्या रोख रकमेसह ८४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना १६ ते १७ एप्रिल दरम्यान घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समता संदीप कोलगे ( ५८, कुंभार्ली, गणेशवाडी, चिपळूण ) या बाहेरगावी गेलेल्या असताना बंद घराचा कडी कोयंडा उचकटून लॉकरमध्ये ठेवलेली ८० हजाराची रक्कम तसेच ३ हजार रुपये किंमतीचे दोन चांदीचे ग्लास , १२०० रुपये किंमतीची सोन्याची नथ, ५०० रुपये किंमतीचा चांदीचा मुकूट असा एकूण ८४ हजार ७०० रुपयांचा माल चोरीस गेला. याबाबतची फिर्याद कोलगे यांनी अलोरे शिरगाव पोलीस स्थानकात दिल्यानंतर संशयित अज्ञाताविरोधात भादविकलम ४५४ , ४५७ , ३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत.