(चिपळूण)
चिपळूण-गुहागर मार्गावर रिगल कॉलेजनजीक भरधाव वेगाने निघालेल्या कारने डमडम आणि रिक्षाला धडक दिली. हा अपघात चिपळूण-गुहागर मार्गावर मंगळवारी (४ जुलै) दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास झाला. या तिहेरी अपघातात नऊजण जखमी झाले आहेत. यामध्ये दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे, तर एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. डमडममधील २० दिवस व सहा महिन्याची दोन बालके दैव बलवत्तर म्हणून बचावली आहेत.
गोवळकोट रोडकडून गुहागरच्या दिशेने जाणारी कार रिगल कॉलेजच्या अलीकडे आली असता समोरून गुहागरकडून येणाऱ्या डमडमला कारने जोरदार धडक दिली. या धडकेनंतर ही डमडम प्रवाशांसह रस्त्याच्या बाजूला जाऊन कलंडली. त्यानंतर भरधाव कारने समोरून येणाऱ्या रिक्षालाही जोरदार धडक दिली आणि रिक्षा पलटी झाली.
या अपघातात गुहागर तालुक्यातील कोंडकारूळ येथील सुभाष कृष्णा अडूरकर (वय २६), प्रतीक जाक्कर, डमडम चालक अमर मोरे (रा. वेळणेश्वर), सिया अडूरकर हे किरकोळ जखमी झाले आहेत. तसेच चिमुकल्या मुली रिया जाक्कर व उर्वी जाक्कर या सुदैवाने बचावल्या. उर्वरित लोकांना किरकोळ दुखापत झाली.
तसेच रिक्षामधील चालक संजय साबळे (रा. कोंढे माळवाडी) यांना गंभीर दुखापत झाली आहे. अपघातात विद्यार्थी रूद्र भारद्वाज हा गंभीर जखमी झाला असून, त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे, तर एक मुलगी किरकोळ जखमी झाली आहे. अपघात झाल्यानंतर या कारच्या चालकाने पळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
या अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर जखमींना तत्काळ येथील लाईफ केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहेत. या अपघातात रिक्षा व डमडमचे मोठे नुकसान झाले आहे.