(चिपळूण / प्रतिनिधी)
चिपळूण येथील समाजसेवक, राष्ट्र सेवा दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि श्रमिक सहयोग संस्थेचे राजन इंदुलकर यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसह काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत नांदेड जिल्ह्यात सहभाग घेतला.
श्री. इंदुलकर यांच्यासोबत या यात्रेत राष्ट्र सेवा दलाचे चिपळूण केंद्राचे अध्यक्ष प्रमोद जाधव, पंढरपूर येथील साने गुरुजी स्मारक समितीचे सचिव दादासाहेब रोंगे, राष्ट्र सेवा दलाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश कांबळे, पुणे येथील जन आंदोलनाचे कार्यकर्ते भार्गव पवार, पालघर जिल्हा जनता दलाचे अध्यक्ष प्रकाश लवेकर आदींचा सहभाग होता. या यात्रेतील सहभागाच्या अनुभवाबाबत श्री. इंदुलकर यांनी चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव यांच्याशी संवाद साधला.
यावेळी श्री. इंदुलकर म्हणाले की, कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रेत नांदेडहून काही अंतर चाललो. यात्रेच्या पुढे वेगाने, निर्धाराने चालणारे राहुल गांधी, सोबत शिस्तीत चालणारी सहकारी मंडळी, रस्त्याकडेने सर्वत्र प्रेमपूर्वक नजरेने न्याहळणारी, ठिक-ठिकाणच्या सभांमध्ये सहभागी होणारी हजारो लाखो माणसे हा अनुभव रोमांचक होता. लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुता या भारतीय मूल्यांच्या राजरोस चिंधड्या उडवल्या जात असताना आणि त्यामुळे कमालीची अस्वस्थता, चिंता दाटली असताना प्रेमाचा आणि भयमुक्तीचा संदेश घेऊन ही यात्रा निघाली आहे. यात्रेतील वेग, निर्धार, आत्मविश्वासाचा मेळ, त्यातही सर्वत्र विहरणारी सहजता, साधेपणा आणि संवादी वृत्ती हे सारे काही आश्वासक आहे.
ते पुढे म्हणाले, की हा अनुभव रोमांचकारी होता. पदयात्रेत अनेक बाबी जाणवल्या. हजारो माणसे एका ध्येयाने रस्त्याने चालताना मागे कागद, पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिक आदी कचरा पडत नव्हता. काही पडलेच तर लगेच उचलले जात होते. ही यात्रा काँग्रेसने आयोजित केली असली, तरी असंख्य जनसंघटना, सामान्य लोक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते, होत आहेत, तेही “संविधान बचाव देश बचाव” या एका भूमिकेतूनच. हीच परिवर्तनाची नांदी आहे, असे श्री. इंदुलकर यावेळी म्हणाले. पदयात्रेत सहभाग घेतल्याबद्दल प्रशांत यादव यांनी श्री. इंदुलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना धन्यवाद दिले.