चिपळूण शहरातील सावकारकीचा विषय तालुक्यात चांगलाच गाजत असून या प्रकरणी नुकतेच या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तर या सावकारकीचे नवनवीन मुद्दे समोर येत आहेत. या लोकांची पठाणी वसुली कशी आहे हे दिसून येत आहे.
गेल्या काही वर्षांपासून चिपळुनात सावकारकी चा विषय चांगलाच गाजत आहे. आता तर गेल्या काही दिवसांपूर्वी वडनाका येथील अभिजित गुरव या विवाहित तरुणाने आत्महत्या केल्यानंतर सावकारकीचा विषय आणखीनच पुढे आला आहे. यानंतर येथील नागरिक संतप्त झाले असून महिला व नागरिकांनी लोक प्रतिनिधींची भेट घेत या सावकारांवर कारवाई करावी अशी मागणी केली. तसेच पोलिसांना देखील निवेदन दिले. यानंतर एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार चांगदेव व शिवा खंडजोडे या दोघांसह पूजा मिरगल या तिघां विरोधात सावकारकीचा गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे सावकारकी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
या सावकारांकडून ५ हजार रुपये कर्जाऊ घेतले तर तीन महिन्यात ९ हजार ६०० रुपये मोजावे लागतात. काही कारणास्तव हप्ता थकल्यास भुर्दंड आहेच, या वरून या सावकारांची कर्ज वसुली कशी आहे? असे स्पष्ट होत आहे.
एका महिलेने सावकारांकडून होत असलेल्या कर्ज वसुली व दमदाटीबाबत तक्रार केल्यानंतर दोन सावकारांसह एका महिलेविरोधात तक्रार दाखल झाली आहे. यानंतर सावकारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. शिवाय काही सावकारांनी आपली कार्यालये बंद केली आहेत. या सावकारांचे कारनामे हळूहळू उघडकीस येऊ लागले आहेत.