(चिपळूण)
चिपळूण तालुका नाभिक समाजोन्नती ही संघटना शिरोधार्थ मानून चिपळूणध्ये निव्वळ सेवाभावी हेतूने संत श्रीसेना महाराज प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी रुपेश राऊत तर सेक्रेटरीपदी महेंद्र साळुंखे यांची एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी व्यवसाय, उद्योग, नोकरी, सेवानिवृत्त अशा विविध क्षेत्रातील समाजबंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पंढरी तथा आबा चव्हाण यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये श्री. नरेंद्र तथा काका चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले. नाभिक समाजोन्नती संघटनेचे सेक्रेटरी संदीप शिंदे यांनी प्रस्तावनेमध्ये बैठकीचा उद्देश स्पष्ट करताना नाभिक समाजाला हितकारक सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि आरोग्य विषयक उपक्रम राबविणे, गरजवंत अशा गरीब होतकरु हुशार विद्यार्थ्याला योग्य मार्गदर्शन करुन सहाय्य करणे, शैक्षणिक गरजेची विविध दाखले आणि कागदपत्रांसाठी मार्गदर्शन करणे, तरुणांसाठी करीअर मार्गदर्शन शिबीर आयोजित करणे, शासकीय योजनेची माहिती देऊन गरजवंतांना मदत करणे, वधुवर सूचक मंडळ स्थापन करणे, महिला सक्षमीकरण उपक्रम राबवणे, संत श्री सेना महाराज आणि समाजातील थोर इतिहास पुरुषांच्या कार्याच्या प्रचार प्रसारासाठी प्रयत्न करणे आदी अनेक उदिष्ट्चे ठेवून संत श्री. सेना महाराज प्रतिष्ठान स्थापन करण्यासाठी आपण जमलो असल्याचे सांगितले.
पत्रकार राजेंद्रकुमार शिंदे यांनी हे प्रतिष्ठान का आवश्यक आहे आणि त्याद्वारे कशा प्रकारे समाजहिताची कामे करता येतील हे विशद केले. यानंतर उपस्थित समाजबंधुंनी विविध प्रश्न आणि शंका विचारुन समाधान करुन घेतले. सांगोपांग झालेल्या या चर्चेतून संत श्री सेना महाराज प्रतिष्ठान स्थापन करण्यात आले आणि याच वेळी पुढील कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी रुपेश राऊत, उपाध्यक्षपदी सुमंत शिंदे आणि किरण जाधव, सेक्रेटरी पदी महेंद्र साळुंखे, सहसेक्रेटरीपदी दिपक राऊत, प्रसिध्दी प्रमुख म्हणून राजेंद्रकुमार शिंदे तर सहप्रसिध्दी प्रमुख श्रवण चव्हाण, समन्वयकपदी संदीप शिंदे आणि सदस्यपदी रमाकांत पवार, काका चव्हाण, अमोल राऊत, संतोष चव्हाण आणि दिलीप जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी नुतन कार्यकारीणीला शुभेच्छा देण्यासाठी चिपळूण तालुका नाभिक समाजोन्नती संघटनेचे शहर अध्यक्ष विशाल राऊत, माजी तालुका उपाध्यक्ष आणि सल्लागार विजय शिंदे, सल्लागार अशोक यादव आदी मान्यवर उपस्थित होते. समाजाचे एक चांगल्या दिशेने पाऊल पडले असून या प्रतिष्ठानद्वारे चांगले उपक्रम राबविले जातील, आपल्या हातून समाजहिताची कामे होवोत अशा शब्दात विशाल राऊत यांनी तर आज खरंच मनापासून आनंद होत आहे. विविध क्षेत्रातील माणसे एकत्र येऊन समाजहितासाठी काम करणार आहेत आणि त्यासाठी हे प्रतिष्ठान स्थापन करण्यात आले आहे. आमचे सहकार्य आणि शुभेच्छा कायमच असतील या शब्दात विजय शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. चिपळूण तालुका समाजोन्नती संघटनेचे तालुका अध्यक्ष संजय जाधव हे त्यांच्या पूर्वनियोजित कामामुळे येऊ शकले नाहीत. मात्र, त्यांनी त्यांच्या शुभेच्छा असल्याचे कळवले.
नूतन अध्यक्ष रुपेश राऊत यांनी मी अध्यक्ष असलो तरी आपण सर्वच अध्यक्ष आहोत, त्यामुळे आपण सर्वांनी मिळून समाजाला एका उंचीवर नेण्याचा प्रयत्न करु असे सांगितले. नवनिर्वाचित कार्यकारीणी आणि हे प्रतिष्ठान होण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे राजेंद्रकुमार शिंदे, संदीप शिंदे, काका चव्हाण, पंढरीनाथ चव्हाण यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काका चव्हाण यांनी तर आभार श्री. महेंद्र साळुंखे सर यांनी केले. यावेळी वरील मान्यवरांबरोबरच सेवानिवृत तलाठी शंकर तथा आप्पा चव्हाण, सेवानिवृत दिपक कदम, कृष्णा एन्टीऑक्सीडंटचे व्यवस्थापक सुयोग चव्हाण, पंचायत समिती ग्रा.पा.पु. कनिष्ठ लिपीक अमोल राऊत, सेवानिवृत्त एकनाथ यादव, व्यावसायिक चेतन जाधव, अनिकेत जाधव, सुनील कदम, महादेव राऊत, किशोर राऊत, प्रशांत राऊत, अतिष राऊत, प्रदीप पवार, सोहम चव्हाण, अविनाश यादव, सुमित चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.