(चिपळूण)
आपल्या आदेशाप्रमाणे शिक्षकांनी काम करावे अशी बंधने लादणार्या चिपळुणातील एका लोकप्रतिनिधीने चक्क शिक्षकाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना काल सोमवारी घडली.
जनता दरबारासाठी चिपळूण पोलीस स्थानकात आलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षकांसमोर या शिक्षकाने त्या लोकप्रतिनिधीकडून होत असलेल्या त्रासाबाबतच्या तक्रारीचा पाढाच वाचला. त्यानुसार पोलीस अधिक्षकांनी रितसर तक्रार देण्याच्या सूचना या शिक्षकाला केल्या. शाळा सुटल्यानंतर अतिरिक्त काम करावे असा आदेश या लोकप्रतिनिधीने काढला होता. या आदेशाला त्या शिक्षकाने विरोध दर्शवला. यामुळे संतापलेल्या या लोकप्रतिनिधीने त्या शिक्षकाला मारहाण केली. या घटनेनंतर हा शिक्षक रडत थेट पोलीस स्थानकात तक्रार देण्यासाठी आला होता. याचदरम्यान नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी व समस्या जाणून घेण्यासाठी चिपळूण पोलीस स्थानकात आयोजित केलेल्या जनता दरबारासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग हे आले असता त्यांची भेट घेऊन या शिक्षकाने झालेल्या मारहाणीची हकीकत त्यांना सांगितली. तसेच सातत्याने होत असलेल्या त्रासाबद्दलच्या तक्रारांचा पाढादेखील त्यांनी त्यांच्यासमोर वाचला.
यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षकांनी त्या शिक्षकाला रितसर तक्रार देण्याच्या सूचना केल्या. दरम्यान पोलीस स्थानकात आपली तक्रार देण्यासाठी शिक्षक आला असल्याची माहिती मिळताच हा लोकप्रतिनिधीदेखील काहीवेळाने पोलीस स्थानकात दाखल झाला. त्याचवेळी त्या शिक्षकाकडून तक्रार देण्याची प्रक्रिया सुरु होती.