(चिपळूण)
येथील शतकोत्तर हिरक महोत्सवी परंपरा लाभलेल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने येत्या शनिवारी (६ जानेवारी) पत्रकार दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम वाचनालयाच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता संपन्न होईल. यावेळी रत्नागिरी जिल्हयात १८५४ साली पहिले वर्तमानपत्र ‘जगन्मित्र’ सुरु करणारे पत्रकार कै. जनार्दन हरि आठल्ये, हिंदी वृत्तपत्रसृष्टीचे भिष्म पितामह, कै. बाबुरावजी रामचंद्र पराडकर आणि तळहाती शिर घेऊन स्वातंत्र्यसमरात देहाची समिधा अर्पण करणारे क्रांतिकारक कै. गणेश गोपाळ आठल्ये या तीन ‘अपरान्त’पुत्रांच्या तैलचित्राचे अनावरण आमदार शेखर निकम यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक धनंजयजी कुलकर्णी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या कार्यक्रमाला सर्वानी उपस्थित रहावे असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्याध्यक्ष धनंजय चितळे, कार्यवाह विनायक ओक यांनी केले आहे.