(चिपळूण)
रस्त्याचे काम सुरू असताना कचरा टाकण्यासाठी खासगी वाहन प्रकल्पावर नेल्याने वारणा करणाऱ्या नगर परिषदेच्या आरोग्य निरीक्षक व कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार सोमवारी सकाळी घडला. हा वाद पोलीस स्थानकापर्यंत नेण्यात आला. मात्र येथे माफीनामा झाल्यानंतर या वादावर पडदा टाकण्यात आला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शिवाजीनगर परिसरात असलेल्या कचरा प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्याचे सध्या काम सुरू आहे. त्यामुळे काही दिवस कचरा उचलण्याचे काम थांबवण्यात आले असून नागरिकांनी कचरा साठवून ठेऊन घंटागाड्या आल्यावर तो द्यावा असे आवाहन नगर परिषदेने केले आहे.
सोमवारी या रस्त्यावर कारपेट करण्याचे काम सुरू होते. असे असताना एकजण आपल्या वाहनातून फलक बनवताना उरणारे साहित्य घेऊन कचरा प्रकल्पात टाकण्यासाठी जात होता. हा प्रकर येथील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी त्यास मज्जाव केला. तरीही तो जबरदस्तीने वाहन घेऊन प्रकल्पाकडे गेला. तेथून परत येत असताना त्याचे वाहन अडवण्यात आले. यावेळी त्याने आरोग्य निरीक्षक महेश जाधव, बांधकाम विभागातील अभियंता आशिष सुर्वे व काही कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. त्यानंतरही माहिती नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानुसार सर्वजण घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्याला पोलीस स्थानकात आणण्यात आले. येथे धक्काबुक्की करणाऱ्याने दिशाभूल करणारी माहिती देण्यास सुरूवात केली. त्यामुळे पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी त्याची कानउघडणी करत त्याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याचा सूचना अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना केल्या. यावेळी त्याच्यासोबत असणाऱ्या त्याच्या मालकाने मी माफी मागतो, गुन्हा दाखल करू नका अशी विनंती केली.
त्यानंतर नगर परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रसाद साडविलकर, राजेंद्र खातू, विनायक सावंत, संतोष शिंदे यांच्यासह अन्य कर्मचारी, धक्काबुक्की करणारा व्यक्ती, त्याचा मालक हे सर्वजण बाहेर गेले. तेथे माफीनामा झाल्यावर आम्ही कोणतीही तक्रार करणार नाही असे संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पोलिसांना सांगितल्याने या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला.