(चिपळूण)
शहरातील खेराडे कॉम्प्लेक्स येथे एकाने सोन्याचे नवीन दागिने घडविण्यासाठी दिलेले सोने प्रणव गोल्ड या ज्वेलर्सच्या दुकानदाराने परत न दिल्याने कृष्णंद्र उर्फ प्रणव मोंडल याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सुमारे सव्वा लाखाचे दागिने या ज्वेलर्सच्या मालकाने परत दिले नाहीत, असा आरोप करण्यात आला आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. १४ ऑक्टोबर २०२२ ते ९ जानेवारी २०२३ या कालावधीत घडली. शहरातील एकाने प्रणव गोल्डस यांच्याकडे नवीन डिझाईनचे दागिने बनविण्यासाठी २७ ग्रॅमचे जुने दागिने दिले होते. आपण नवीन डिझाईनचे दागिने बनवून देऊ असे त्यांनी संबंधितांना सांगितले. मात्र वारंवार याबाबत पाठपुरावा केला आणि आपल्याला नवीन डिझाईनचे दागिने द्या, अशी मागणी संबंधिताने त्यांच्याकडे केली. नवीन डिझाईनचे दागिने तयार झाले नसतील तर जुने दागिने तसेच तरी परत द्या, असे सांगूनही दागिने परत मिळाले नाहीत. त्यामुळे आपली फसवणूक झाल्यामुळे संबंधिताने पोलिसांत फिर्याद दिली आहे.